उपमुख्यमंत्र्यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचीच दयनीय अवस्था; धूळ, खडीमुळे वाहनधारक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:25 IST2026-03-11T16:24:57+5:302026-03-11T16:25:25+5:30
सुरूर-महाबळेश्वर मार्गाची दुरवस्था; पर्यटननगरीचा आर्थिक कणा मोडला; पर्यटकांचीही पाठ

उपमुख्यमंत्र्यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचीच दयनीय अवस्था; धूळ, खडीमुळे वाहनधारक हैराण
सातारा : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणीला जोडणारा सुरूर-पोलादपूर रस्ता सध्या ‘मृत्यूचा’ सापळा बनला आहे. विशेष म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव दरे महाबळेश्वर तालुक्यात आहे, तर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मंत्र्यांचा हा नित्य प्रवासाचा मार्ग असतानाही, सरकारचे आपल्याच नेत्यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे दुर्लक्ष का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
वाई, पाचगणी व महाबळेश्वर या पर्यटनस्थळांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांनी या भागाकडे आता पाठ फिरवल्याचे चित्र आहे. परिणामी, हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी चालक व किरकोळ विक्रेत्यांचे उत्पन्न शून्य झाले आहे. संसाराचा गाडा कसा चालवायचा आणि बँकांचे हप्ते कसे भरायचे, या विवंचनेत सामान्य नागरिक व वाईतील शेतकरी सापडला आहे. रस्त्यासाठी शेतकरी, पर्यावरणप्रेमी, वाहनधारक व नागरिकांना सातत्याने रस्त्यावर उतरावे लागत आहेत. मात्र, या आंदोलनांना प्रशासन केराची टोपली दाखवत असल्याने आता जनक्षोभ उफाळून येत आहे.
तीन वर्षांत काम पूर्ण होणार का?
महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या (एमएसआईडीसी) माध्यमातून या रस्त्याचे काम सुरू आहे. फेब्रुवारी २०२५ पासून कामाचा श्रीगणेशा झाला असला, तरी कामाची गती कासवापेक्षाही संथ आहे. ८४ किलोमीटरच्या रस्त्यासाठी तीन वर्षांची मुदत दिली असली, तरी सुरूर ते वाई या १२ किलोमीटरच्या टप्प्यावर वर्षभरात ५० टक्के कामही पूर्ण झालेले नाही. नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उर्वरित काम कधी पूर्ण होणार? याचे उत्तर सध्यातरी कोणाकडे नाही.
ठेकेदारावर कोणाची मेहरबानी?
हा मार्ग मंत्री मकरंद पाटील यांच्या मतदारसंघातील दळणवळणाचा महत्त्वाचा दुवा आहे. वर्षभरापासून वाईतील रस्ता खोदून ठेवलेला असतानाही, ठोस पावले उचलली जात नाहीत. उपमुख्यमंत्री आणि स्थानिक मंत्र्यांचा प्रभाव असलेल्या या मार्गावर ठेकेदाराची ही मनमानी नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, त्याच्यावर कोणाची मेहरबानी आहे? याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.
रस्त्याचे अंतर आणि सद्य:स्थिती...
सुरूर ते वाई १२ किलोमीटर : प्रचंड खोदकाम, वाहतुकीचा बोजवारा.
वाई ते महाबळेश्वर ३२ किलोमीटर : रस्ता गायब, खड्ड्यांचे साम्राज्य अन् प्रचंड धूळ
महाबळेश्वर ते पोलादपूर ४० किलोमीटर : प्रतापगड ते पोलादपूर सत्याचे काम गतीने
सुरूर ते वाई या रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर आहे. या १२ किलोमीटरच्या टप्प्यातील शेतकरी आणि व्यावसायिक आज आर्थिक गर्तेत सापडले आहेत. उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी एकदा या मार्गाने प्रवास करावा, त्यांनी नागरिकांच्या व्यथा समजावून घ्याव्यात. आमच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. - प्रशांत डोंगरे, पर्यावरणप्रेमी, वाई