आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 08:54 IST2025-12-14T08:53:54+5:302025-12-14T08:54:35+5:30
विश्व हिंदू परिषदेच्या वनवासी कल्याण केंद्र आश्रमावर ऑगस्ट १९९१ मध्ये झालेल्या हल्ला प्रकरणात ३४ वर्षांनंतर न्यायालयाने निकाल दिला आहे.

आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
तलासरी: विश्व हिंदू परिषदेच्या वनवासी कल्याण केंद्र आश्रमावर ऑगस्ट १९९१ मध्ये झालेल्या हल्ला प्रकरणात ३४ वर्षांनंतर न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणातील अटकेत असलेल्या एकमेव हयात आरोपी सतवा लाडक्या भगत याला पालघर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवल्याने त्याची अखेर सुटका झाली आहे.
१४ ऑगस्ट १९९१ रोजी वनवासी कल्याण केंद्र आश्रमावर १५० ते २०० जणांच्या जमावाने दगड व काठ्यांच्या साहाय्याने हल्ला केल्याचा आरोप होता. या घटनेत आश्रमाचे तत्कालीन व्यवस्थापक महादेव जयराम जोशी यांना गंभीर दुखापत झाली होती, तसेच आश्रमाची तोडफोड आणि एक रिक्षा पेटवण्यात आली होती.
या प्रकरणात दाखल मूळ आरोपपत्रात ३२ आरोपींचा समावेश होता. दीर्घकाळच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर ७ जानेवारी २००३ रोजी सर्व ३२ आरोर्षीची निर्दोष मुक्तता केली होती.
मात्र, त्यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात चार नव्या आरोपींचा समावेश करण्यात आला. मात्र, या चारपैकी तीन आरोपींचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाला, तर उर्वरित एकमेव आरोपी सतवा लाडक्या भगत याच्याविरोधात पालघर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. चौधरी इनामदार यांच्या समोर सुनावणी झाली.
काय म्हणाले न्यायालय ?
१. न्यायालय निकाल देताना म्हणाले की, आरोपीविरोधात थेट व विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव आहे.
२. या प्रकरणातील तक्रारदार व गंभीर जखमी साक्षीदार महादेव जोशी, तसेच साक्षीदार शांताराम झोळ न्यायालयात आरोपीची ओळख पटवू शकले नाही, तसेच आरोपीविरोधात ठोस आरोप करण्यास त्यांनी नकार दिला.
३. या सर्व बाबींचा विचार करून ३ दिलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीवर गुन्हा सिद्ध होत नाही. त्यामुळे सर्व आरोप रद्द करून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असे सत्र न्यायालयाने सुनावणीदरम्यान नमुद केले.