छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे मराठवाड्यात अक्षरश: कहर केला आहे. बीड, धाराशिव, हिंगोली, जालना जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. प्रकल्पांमधून विसर्ग सोडल्याने गावागावांमध्ये पाणी शिरले आहे. उरलीसुरली पिकेही खरडून निघाली आहेत.
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने आजपर्यंत ५ हजार ३२० गावांतील पिकांचा चिखल केला. २२ सप्टेंबरला एकाच दिवसात तब्बल ७५ महसूल मंडळांत अतिवृष्टी होण्याचा यंदा विक्रम झाला आहे. दोन दिवसांत विविध जिल्ह्यात २२ गावांचा संपर्क तुटला. ७० जणांना सुरक्षित ठिकाणी हलविले. सिंदफनाने ५० वर्षांचा विक्रम मोडला : शिरूरला सिंदफना नदीला महापूर आला. यामुळे ५० वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले. घरे पाण्याखाली गेल्याने शेकडो संसार उद्ध्वस्त झाले.
बांधलेली जनावरे दगावली : पिंपळगाव (ता. भूम) गोठ्यात पुराचे पाणी शिरल्याने बांधलेल्या १६ गायींचा जागेवरच मृत्यू झाला. गावात ६५ तर अंतरगाव येथे १२ जनावरे दगावली. परभणीत पुरात तरुण बेपत्ता झाला. तर जालन्यात पुरात अडकलेल्या १४ जणांची सुटका करण्यात आली.
हेलिकॉप्टरने काढले ६० नागरिकांना सुखरूप धाराशिव इथे रात्रीतून पावसाने कहर केला. २२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. तसेच परंडा तालुक्यात नद्यांना महापूर आहे. पुराचे पाणी सुमारे २० पेक्षा अधिक गावांमध्ये शिरले. यामुळे पुरात अडकलेल्या ६० नागरिकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले. बोटीद्वारेही शेकडो नागरिकांना वाचविण्यात आले.
शेतकऱ्यांना आवाहन २७ तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते.२८ तारखेला पश्चिम भागात जोर कायम राहू शकतो. संभाव्य स्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले.
संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर वाढणार जोरपुणे / मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील ३ दिवसात हलका ते मध्यम आणि २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. मंगळवारी (दि. २३) कोकण, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बुधवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. त्यामुळे मॉन्सून सक्रिय राहील, परतीच्या प्रवासाबाबत अंदाज वर्तविणे शक्य नसल्याचे डॉ. सानप यांनी स्पष्ट केले.
जळगावात रस्ते बंद, जिल्हाधिकारीही अडकलेजळगाव/अहिल्यानगर : जिल्ह्यात परतीच्या पावसाचे तडाखे सुरूच आहेत. भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाणी शिरले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगावहून पाचोऱ्याकडे जात असताना पुरामुळे त्यांचा ताफा थांबला. काही तरुण दुचाकी पाण्यातून नेण्याचा प्रयत्न करत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अडविले. अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाने धुमाकूळ घातला. २४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. यामुळे नद्यांना पूर आले.
विदर्भात पिकांचा चिखल चंद्रपूर : सप्टेंबरमध्ये ३६३०.५८ हेक्टरवर नुकसान. ५,२६५ शेतकरी बाधित. गडचिरोली : जुलै व ऑगस्टमध्ये ११,६३९.७५ हेक्टरवर हानी. १८ हजार ९१९ शेतकरी बाधित. यवतमाळ : अतिवृष्टीमुळे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान. १७३७ गावांत फटका. वर्धा : तीन महिन्यात २१,५०६.५६ हेक्टरवर नुकसान, २९ हजार ६७० शेतकऱ्यांना बसला.