याच कंपनीच्या विमानाचे झाले होते दोन तुकडे, मग पुन्हा परवानगी कुणी दिली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 07:17 IST2026-01-29T07:16:11+5:302026-01-29T07:17:13+5:30
Ajit Pawar Death News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या खासगी विमान कंपनीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या तीन वर्षांत ‘लिअरजेट ४५’ विमानाला अपघात होण्याची ही दुसरी मोठी घटना आहे.

याच कंपनीच्या विमानाचे झाले होते दोन तुकडे, मग पुन्हा परवानगी कुणी दिली?
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या खासगी विमान कंपनीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या तीन वर्षांत ‘लिअरजेट ४५’ विमानाला अपघात होण्याची ही दुसरी मोठी घटना आहे.
१४ सप्टेंबर २०२३ रोजी कंपनीचे विमान मुंबई विमानतळावर कोसळले होते. या दुर्घटनेत सहा प्रवासी जखमी झाले होते. या घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले होते, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली होती.
अजूनही अहवाल नाही
धक्कादायक बाब म्हणजे २०२३ मध्ये झालेल्या अपघाताचा अंतिम चौकशी अहवाल अद्याप आलेला नाही, तरीही कंपनीचे कामकाज सुरूच होते. बॉम्बार्डियर लिअरजेट कंपनीचे हे विमान मध्यम आकाराचे बिझनेस जेट म्हणून ओळखले जाते.
१९९८ मध्ये आलेले हे विमान हॅनीवेल इंजिनांनी सज्ज असते. मात्र, याच मॉडेलचे विमान सलग दुसऱ्यांदा अपघाताला बळी पडल्याने या विमानांच्या सुरक्षिततेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विमानाला उड्डाणास परवानगी कशी दिली?
असंख्य त्रुटी असलेल्या या विमानाला उड्डाण करण्याची परवानगी कशी दिली? ती कोणी दिली? डीजीसीए काय करत होते? जुन्या आणि अपघातग्रस्त विमानाला पुन्हा ‘फिटनेस सर्टिफिकेट’ देताना कोणत्या निकषांचा वापर झाला? ही कंपनी व्हीव्हीआयपींसाठी जुनी, जीर्ण झालेली विमाने वापरत आहे, असा दावा केला जात आहे. कंपनीकडून याबाबत कोणताही प्रतिसाद येत नसून या अपघाताची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
व्हीव्हीआयपी विमान आणि मेंटेनन्सचा मुद्दा
अपघातग्रस्त विमान हे अतिशय सुरक्षित मानले जाते. या विमानातून अनेकदा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती प्रवास करत असतात. अशा विमानांची देखभाल संबंधित कंपन्यांकडून अत्यंत काटेकोरपणे केली जाते. शिवाय उपमुख्यमंत्री यातून प्रवास करणार असल्यामुळे त्याची सर्व्हिसिंग झालेलीच असावी, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. देखभालीत त्रुटी असण्याची शक्यता कमी असली, तरी तांत्रिक बिघाड पूर्णपणे नाकारता येत नाही. अपघाताचे खरे कारण अहवालानंतरच समोर येणार आहे.