सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका न्यायमूर्तींसारखी : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 13:20 IST2022-07-03T13:20:07+5:302022-07-03T13:20:23+5:30
सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या आसनावरून करावा लागतो. हे कठीण काम आहे - उपमुख्यमंत्री

सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका न्यायमूर्तींसारखी : देवेंद्र फडणवीस
रविवारी विधानसभेत महाविकास आघाडीला मोठा धक्का लागला असून राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूनं १६४ मतं पडली. तर प्रस्तावाच्या विरोधात १०७ जणांनी मतदान केलं. तर ३ जण मतदानादरम्यान तटस्थ राहिले. दरम्यान, यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका ही एका न्यायमूर्तींसारखी असल्याचं म्हटलं.
“खरं म्हणजे या सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका ही एका न्यायमूर्तींप्रमाणे आहे. सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या आसनावरून करावा लागतो. हे कठीण काम आहे. ज्याच्या बाजूनं निर्णय येतो त्याला न्याय आणि दुसऱ्याला अन्याय वाटतो. पण एका गोष्टीच्या दोन बाजू असतात असं आपण म्हणतो. एक खरी एक खोटी, पण असं नाही एक त्यांची एक आमची बाजू असते. पण एक तिसरी बाजू असते ती खरी बाजू असते आणि त्या खऱ्या बाजूला या ठिकाणी प्रतिध्वनित करण्याचं काम हे अध्यक्षांना करावं लागतं,” असं फडणवीस म्हणाले.
पुलंच्या वाक्याचा उल्लेख
"राहुल नार्वेकर देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. तसंच इतिहासात पहिल्यांदाच वरच्या सभागृहात सासरे सभापती आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी जावई असा योगायोग जुळून आला आहे. पु.ल.देशपांडे म्हणायचे जावई आणि सासऱ्याचं कधी पटत नाही. पण तसं इथं होणार नाही. याची आम्हाला खात्री आहे", असं फडणवीस म्हणाले.