निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:41 IST2025-11-14T17:39:02+5:302025-11-14T17:41:54+5:30
Maha Vikas Aghadi Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरूवात झाली आहे. निवडणुकीतील अपयशावरून ठाकरेंच्या नेत्याने थेट काँग्रेसलाच लक्ष्य केले. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यानेही ठाकरेंच्या नेत्याला सुनावले.

निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Bihar Election Result Maha Vikas Aghadi: बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार याचे चित्र स्पष्ट होताच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील खदखद बाहेर पडली. 'काँग्रेसने आता वृत्ती बदलावी', असे म्हणत ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांनी सुनावले. ठाकरेंच्या नेत्याने पराभवाचे खापर काँग्रेसवरच फोडले. त्यामुळे काँग्रेसमधून याला उत्तर देण्यात आले. 'शिवसेनेने काँग्रेसच्या सगळ्या जागा बळकावल्या', असे म्हणत काँग्रेसचे भाई जगतापही भडकले. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मविआमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसू लागले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा दारुण पराभव झाला. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला मोठी कामगिरी करण्यात अपयश आले. तर काँग्रेसही फार यश मिळवू शकलेली नाही. काँग्रेसच्या भूमिकेवर बोट ठेवत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
काँग्रेसच्या वृत्तीमुळे मित्रपक्षांचे नुकसान
"पराभव झाला हे मान्य आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर केला आहे, खरं आहे. पण, तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करायला खूप उशीर झाला. काँग्रेसचे असेच आहे. जागावाटपात काँग्रेसला जास्त जागा, मोठा वाटा हवा असतो. प्रत्यक्षात विजयाचं प्रमाण अतिशय कमी आहे. काँग्रेसच्या या वृत्तीमुळेच मित्रपक्षांचे नुकसान होत आहे", असे अंबादास दानवे म्हणाले.
महाराष्ट्रात केलेली चूक, बिहारमध्येही केली
दानवे म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला असते आणि जागावाटप आधी केले असते, तर राज्यात वेगळे चित्र असते. जी चूक महाराष्ट्रात झाली, तीच बिहारमध्येही केली. काँग्रेसने आता वृत्ती बदलली पाहिजेत", अशा शब्दात अंबादास दानवे यांनी सुनावले.
काँग्रेस नेत्याचे ठाकरेंच्या शिवसेनेला उत्तर
दानवेंनी केलेल्या टीकेनंतर काँग्रेसच्या नेत्यानेही खडेबोल सुनावले. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप म्हणाले, "अंबादास दानवे खूप विद्वान आहेत. दानवे विरोधी पक्षनेते राहिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा, लोकसभा हे वेगवेगळे विषय आहेत. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना मुंबईला धरून मत मांडलेलं की, काँग्रेसने स्वबळावर लढले पाहिजेत. आजही माझे तेच मत आहे. आमच्या नेत्यांचे काय मत आहे, ते आम्ही मान्य करू."
"भायखळामध्ये शिवसेना कधीच जिंकली नव्हती. वांद्रे पूर्वमध्ये एकदाच शिवसेना जिंकली होती. शिवसेनेने काँग्रेसच्या सगळ्या जागा बळकावल्या आहेत, हे माझे स्पष्ट मत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा कल काय असेल, त्यानुसार चर्चा झाल्या पाहिजेत. आपल्या चर्चा शेवटपर्यंत होतात आणि वेळ उरत नाही, हे मान्य आहे", असे जगताप म्हणाले.
मविआतील दोन्ही पक्षात ठिणगी
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मविआमधील दोन पक्षांची एकमेकांबद्दलची नाराजी चव्हाट्यावर आली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी लागलेल्या असतानाच ही ठिणगी पडली आहे.
महाविकास आघाडीत एकत्र लढण्याचा सूर असताना सुरू झालेला हा वाद वाढणार की शमणार? यावर आघाडीच्या एकीचे भवितव्य ठरणार आहे.