बीड प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा व्हावी हीच भूमिका - प्रफुल्ल पटेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:59 IST2025-01-03T10:58:58+5:302025-01-03T10:59:19+5:30
या प्रकरणात वाल्मीक कराड असो किंवा अन्य कुणी असो, दोषींवर निश्चितच कठोर कारवाई व्हावी, असे खा. पटेल म्हणाले. बीड प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीसुद्धा गठित करण्यात आली आहे. त्यामुळे बाकी चर्चांना अर्थ नाही, असेही ते म्हणाले.

बीड प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा व्हावी हीच भूमिका - प्रफुल्ल पटेल
गोंदिया : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणातील कोणीही गुन्हेगार असोत, त्यांना कडक शिक्षा व्हायला हवी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार) भूमिका असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी गोंदिया येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
या प्रकरणात वाल्मीक कराड असो किंवा अन्य कुणी असो, दोषींवर निश्चितच कठोर कारवाई व्हावी, असे खा. पटेल म्हणाले. बीड प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीसुद्धा गठित करण्यात आली आहे. त्यामुळे बाकी चर्चांना अर्थ नाही, असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीसंदर्भात विचारले असता, खा. पटेल म्हणाले, भुजबळ हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते नाराज आहेत, असे समजू नका. त्यांच्या सूचनांवर मार्ग काढू.
पवार कुटुंब एकत्र आले तर आनंदच होईल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी पवार कुटुंब एकत्र यायला हवे, असे साकडे पांडुरंगाकडे घातले. यावरून दोन्ही पवार एकत्र येतील का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. यावर खा. पटेल यांनी सांगितले की, पवार कुटुंबीय एकत्र आले तर मला आनंदच होईल. पण, सध्या त्या अनुषंगाने कुठली चर्चा अथवा घडामोडी नाहीत.
स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुती म्हणून लढणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा, विधानसभा निवडणुकांप्रमाणेच महायुती करून लढाव्यात, असा एकंदर सूर आहे. पण, यावर अद्याप कुठलीच चर्चा झालेली नाही. या निवडणुका महायुती करून लढाव्यात, यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही खा. पटेल यांनी सांगितले.