पक्ष गेला, चिन्ह गेले, तरी शरद पवार कुठे आहेत? त्यांच्याऐवजी सुप्रिया सुळे आल्या, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 21:09 IST2024-02-06T21:09:00+5:302024-02-06T21:09:37+5:30
Supriya Sule Reaction on EC NCP Result Ajit pawar: खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी ज्या व्यक्तीने पक्षाला जन्म दिला ते शरद पवार कुठे आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.

पक्ष गेला, चिन्ह गेले, तरी शरद पवार कुठे आहेत? त्यांच्याऐवजी सुप्रिया सुळे आल्या, म्हणाल्या...
राजकारणातले बाहुबली असलेल्या शरद पवार यांच्याहातून अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष, पक्षाचे घड्याळ हे चिन्ह नेले आहे. निवडणूक आयोगाने नुकताच याबाबतचा निकाल दिला आहे. याविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी ज्या व्यक्तीने पक्षाला जन्म दिला ते शरद पवार कुठे आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
सुप्रिया सुळेंनी दिल्लीत पत्रकार परिषदेला ही माहिती दिली. ज्या महाराष्ट्रातल्या राज्यसभा खासदारांची टर्म संपत आहे त्या खासदारांसाठी शरद पवारांनी एक फेअरवेल ठेवले आहे. ते सर्व खासदार शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी उपस्थित आहेत. यामुळे शरद पवार बाहेर येऊ शकत नाहीत, असे सुळे यांनी म्हटले आहे. या फेअरवेलला वंदना चव्हाण, प्रकाश जावडेकर यांच्यासह महाराष्ट्रातील खासदार असल्याचे सुळे म्हणाल्या.
तसेच अदृष्य शक्तीने दिलेला हा निर्णय आहे. ज्या व्यक्तीने पक्ष काढला, त्याच्या हातातून पक्ष काढून घेण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. तुमचे घर गावी असेल, ते वडिलांचे आहे, तुम्ही त्यांना बाहेर काढणार का, असा सवालही सुळे यांनी पत्रकारांना विचारला.
आमदारांच्या संख्येवरून निकाल दिल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या संख्येवरून पक्ष कोणाचा हे ठरविता येणार नाही, असा एक निकाल दिलेला आहे. यामुळे आयोगाच्या या निकालाविरोधात आम्ही सर्वोच्च न्य़ायालयात जाणार असल्याचे सुळे म्हणाल्या.