विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 22:11 IST2025-07-16T22:03:52+5:302025-07-16T22:11:46+5:30
एकनाथ शिंदे यांची 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगला हजेरी

विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सर्व सहकार्य करायला तयार असून त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर काही निर्णय घ्यावा लागला तर तोही नक्की घेऊ असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आमिर खान निर्मित 'सितारे जमीन पर' या सिनेमाचा विशेष खेळ आज आयनॉक्स सिनेमागृहात आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना त्यानी, विशेष मुलांच्या आयुष्यावर आधारित 'सितारे जमीन पर' हा सिनेमा तयार केला असून, त्यातून एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्यात आला आहे. विशेष मुलांना देखील सर्वसामान्य मुलांसोबत त्याच शाळेत शिकता यावं याबाबत या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे. विशेष मुले ही इतर मुलांच्या तुलनेत अजिबात वेगळी नसून त्यांनाही इतर मुलांप्रमाणे सर्वसामान्य शाळेत शिकण्याचा तेवढाच अधिकार असल्याचे यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले.
◻️LIVE📍मुंबई 🗓️ 16-07-2025
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 16, 2025
📹 सितारे जमीं पर चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंग प्रसंगी- लाईव्ह https://t.co/CjpxQ3i905
अभिनेते आणि निर्माते आमिर खान यांच्यासह दिग्दर्शक पी. एस. प्रसन्ना यांनाही हा विषय हाती घेऊन सिनेमा बनवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच हा अवघड विषय तितक्याच तरलतेने मांडल्याबद्दल त्यांचे आभार मानले. शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांनी हा खेळ आयोजित करून शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले आहे. देशात दिव्यांग मंत्रालय सुरू करणारे पहिले राज्य हे आपले महाराष्ट्र राज्य आहे. तसेच पालिका स्तरावर याबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर शासन त्यासाठी नक्की सहकार्य करेल असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.