मुंबई - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू यांच्या पक्षांची युती होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा कमी झाला असून राजकीय दृष्ट्या आता हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे असं बोलले जाते. त्यातच मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं समोर आले आहे. त्यात दोन्ही भावांच्या पक्षात ६०:४० असं समीकरण असू शकते. मुंबई महापालिकेत १४७ जागा उद्धव ठाकरे आणि ८० जागांवर राज ठाकरे यांच्या मनसेचे उमेदवार दिसू शकतात.
अनेक माध्यमांत जागा वाटपांबाबत वृत्त प्रसारित झाले आहे. त्यात सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा झाली नाही. परंतु युतीबाबत दोन्हीही भाऊ सकारात्मक आहेत. त्याचेच संकेत दोन्ही पक्षातील नेत्यांकडून मिळत आहेत. दसरा-दिवाळीच्या आसपास युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते. त्यात दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये ६०:४० अशा जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्ष आपापली ताकद पाहून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. ज्या भागात दोन्ही पक्षांचा दबदबा बरोबरीचा आहे तिथे ५०-५० जागा वाटून घेतल्या जातील. या भागात दादर-माहिम, लालबाग, परेल, शिवडी, विक्रोळी, दिंडोशी, घाटकोपर पश्चिम, दहिसर, भांडूप या परिसरातील वार्डांचा समावेश आहे.
उद्धव ठाकरे मविआची साथ सोडणार?
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी शिवसेना-मनसे मुंबई, पुणे, नाशिकसह सगळीकडे एकत्रित लढतील असं म्हटलं होते. मात्र उद्धव ठाकरे हे सध्या महाविकास आघाडीत आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचाही समावेश आहे. परंतु राज ठाकरे यांच्या मनसेची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा नाही असं सांगितले जाते. दुसरीकडे युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक असून त्यांचा कुठलाही निर्णय घेण्याची तयारी आहे असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले होते. त्यामुळे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर उद्धव यांना मविआची साथ सोडावी लागणार असेच चित्र दिसून येते.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली या परिसरात प्रभाव आहे. त्यामुळे जर हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर महायुतीसमोर तगडे आव्हान उभे राहू शकते. मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे बंधू यांच्यासाठी महत्त्वाची मानली जाते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मुंबईत भाजपाला ताकद दाखवून दिली. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचे ३ खासदार निवडून आले तर एक उमेदवार काही मतांनीच पराभूत झाला. विधानसभेलाही मुंबईतून ठाकरेंचे आमदार निवडून आले. त्यात आता मुंबई महापालिकेत कुठलीही जोखीम उद्धव ठाकरेंना घ्यायची नाही. त्या दृष्टीनेच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंबाबत सकारात्मक युतीसाठी बोलणी सुरू केली.