महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 06:53 IST2025-04-25T06:53:03+5:302025-04-25T06:53:28+5:30
मे च्या पहिल्या आठवड्यात मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा?

महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
पुरुषोत्तम राठोड
घोटी (नाशिक) : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्ह्यांच्या विकासाला समृद्ध करण्याच्या दृष्टीने कलाटणी देणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, या महामार्गाचा उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले होते. दुसऱ्या टप्प्याचे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी (कोकणमठाण) ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर २० इंटरचेंज दरम्यान एकूण ८० किमी लांबीचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तर भरवीर इंटरचेंज ते इगतपुरीपर्यंतच्या २५ किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण दि. ४ मार्च २०२४ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांच्या हस्ते झाले होते.
समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या उर्वरित टप्प्यातील ७६ किमीची लांबी नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात येते. सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अभियांत्रिकी आव्हान पेलले.
आठ मिनिटांत पार करता येणार इगतपुरी-कसारा अंतर
या टप्प्यामध्ये एकूण ५ बोगदे असून, या बोगद्यांची एकूण लांबी ११ किमी आहे. त्यातील पॅकेज १४ (इगतपुरी) येथील दुतर्फा बोगदा ७.८ किमी लांबीचा असून, हा देशातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा (१७.६१ मीटर) बोगदा आहे. या बोगद्याची उंची ९.१२ मीटर आहे. या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येणार आहे. कसारा घाटाला यामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.