ठाणे : एसटी महामंडळाचा अध्यक्ष राजकीय व्यक्तीच असतो. संजय सेठी यांची नियुक्ती तात्पुरती आहे. याबाबत कोणीही राजकीय भांडवल करू नये. परिवहन खात्याचा मंत्री मीच आहे, त्यामुळे माझा निर्णय हाच अंतिम असेल, असे मत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
एसटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय सेठी या सनदी अधिकाऱ्यावर सोपवली. शिंदेसेनेला हा धक्का मानला जात आहे. यासंदर्भात ते म्हणाले, भरत गोगावले मंत्री झाल्याने एसटी महामंडळाचे अध्यक्षपद रिक्त झाले. अध्यक्षपदावर राजकीय नेत्यालाच संधी मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
... तर बहिणींना पैसे परत करावे लागतील
लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना जे निकष लावले आहेत त्या निकषांचा कोणी गैरफायदा घेत असेल तर लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे परत करावे लागतील.
तसेच काहींनी दोन दोन ठिकाणी योजनेच्या लाभासाठी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या खात्यात दोन्हीकडे पैसे जमा झाले होते. त्यांनी हे चुकीने झाल्याचे मान्य करत पैसे परत करण्याची तयारी स्थानिक संस्थांकडे दर्शवली असल्याची माहिती त्यांनी दिली.
सनदी अधिकारी जरी अध्यक्ष असला तरी त्यांनी घेतलेला कोणताही निर्णय शेवटी अंतिम मंजुरीसाठी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून माझ्याकडेच येणार आहे. - प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री