"अपेक्षित वेगळे अन् घडतं अनपेक्षित; देवेंद्र फडणवीस काय करतील याचा अंदाज नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 14:02 IST2023-01-22T14:01:44+5:302023-01-22T14:02:15+5:30
नाशिक पदवीधर निवडणूकही देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक आहे. लवकरच या मागे काय राजकारण आहे ते सगळ्यांना कळेल असं खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.

"अपेक्षित वेगळे अन् घडतं अनपेक्षित; देवेंद्र फडणवीस काय करतील याचा अंदाज नाही"
अहमदनगर - नाशिक पदवीधर निवडणुकीवरून भाजपानं अद्याप कुठलीही ठोस भूमिका जाहीर केली नाही. निवडणुकीच्या सुरुवातीपासून भाजपानं या निवडणुकीत सस्पेन्स कायम ठेवला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी माघार घेत मुलगा सत्यजित तांबे यांना अपक्ष म्हणून पुढे केले. शेवटच्या क्षणी घडलेल्या या प्रकारामुळे काँग्रेसला निवडणुकीत तोंडावर पडावं लागले. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तांबे पिता-पुत्राचं पक्षातून निलंबन केले.
याच निवडणुकीत सत्यजित तांबे यांना भाजपा पाठिंबा देईल असं वाटलं होतं परंतु अजूनही भाजपाने काहीच अधिकृत भाष्य केले नाही. त्यात देवेंद्र फडणवीस काय करतील याचा अंदाज नाही, अपेक्षित असते तिथे अनपेक्षित घडतं असं विधान भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. सुजय विखे पाटील यांनी माध्यमांना सांगितले की, भाजपाचं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हेच वैशिष्टे आहे. नेमके काय होतंय आणि कधी काय होईल हे कुणी सांगू शकत नाही. उदाहरण म्हणून राज्यसभा निवडणूक, विधान परिषदेच्या निवडणुका पाहिल्या आहेत. अपेक्षित वेगळे अन् घडतं अनपेक्षित असं त्यांनी सांगितले.
तसेच नाशिक पदवीधर निवडणूकही देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक आहे. लवकरच या मागे काय राजकारण आहे ते सगळ्यांना कळेल. थोडा वेळ आहे. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यावर भूमिका स्पष्ट करत नाहीत तोवर मी बोलणं योग्य नाही असं सांगत सत्यजित तांबे यांनी शिवाजी कर्डिलेंना येऊन भेटावं सर्व काही ठीक होईल असा चिमटा खासदार सुजय विखे पाटील यांनी काढला.
काँग्रेसमधून निलंबनानंतर सत्यजित तांबेची पहिली प्रतिक्रिया
काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा कधीच विचार केला नाही. २२ वर्षं काँग्रेसमध्ये काम केले आहे. जन्मल्यापासून फक्त काँग्रेसच माहिती आहे. माझ्या रक्तात काँग्रेस आहे. माझ्या श्वासात काँग्रेस आहे. आम्ही काँग्रेस सोडून कधी दुसरा विचार केला नाही. अनेक लोक अनेक पक्षांमध्ये गेले, आले. मोठे झाले. पण आम्ही कधी तशी भावना ठेवली नाही. आम्ही एकनिष्ठतेने आम्ही पक्षाबरोबर राहण्याचे काम केले आहे अशी प्रतिक्रिया सत्यजित तांबे यांनी दिली.
त्याचसोबत निलंबित केल्याचं दु:ख आहेच. योग्य वेळी मी त्याला उत्तर देईन. अनेक शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, बँकिंग कर्मचारी संघटना, अनेक लोक, पदाधिकारी मला पाठिंबा देण्यासाठी इच्छुक आहेत. योग्य वेळी त्यावर मी निर्णय घेईन. राजकारण चाललेले आहे. सगळे राजकारण होऊ द्या, मग मी त्यावर बोलेन असे सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले.