ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 06:43 IST2025-11-28T06:42:32+5:302025-11-28T06:43:06+5:30
ठाण्यात संमेलन झाले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तर पुण्यात संमेलन झाले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यजमानपद जाईल. त्यामुळे एका अर्थाने महायुतीतीलल संघर्षाची किनार संमेलनालाही प्राप्त होणार आहे

ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदाकरिता पुणे व ठाणे या सांस्कृतिक राजधानी, उपराजधानीत चुरस सुरू झाली आहे. दोन्ही शहरांतील साहित्यिक हे संमेलन आपल्याच शहरात व्हावे, याकरिता आग्रही आहेत. त्यामुळे ठाण्यातील झणझणीत मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी साहित्यिक ठाण्यात पायधूळ झाडतात की श्रीखंड-पुरीच्या बेताकरिता पुण्याला जातात, अशी चर्चा आहे.
ठाण्यात संमेलन झाले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तर पुण्यात संमेलन झाले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यजमानपद जाईल. त्यामुळे एका अर्थाने महायुतीतीलल संघर्षाची किनार संमेलनालाही प्राप्त होणार आहे. यंदाचे ९९ वे साहित्य संमेलन २०२६ मध्ये साताऱ्यात पार पडणार असून त्यानंतर शतकोत्तर संमेलनाचा मान कोणाला मिळणार यावर आता साऱ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. मराठी साहित्य संमेलनाची परंपरा पुण्यातूनच सुरू झाल्याने ‘शंभरावे संमेलन पुण्यालाच’, असा भावनिक दावा पुण्यातील साहित्यिकांनी केला आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे मुख्य दफ्तर पुण्यात असल्याने ‘निर्णायक फाइल’ पुणेकरांच्या हातात आहे.
भक्कम आर्थिक शक्ती ठरणार निर्णायक
मुंबई मराठी साहित्य संघाचे जुने मंडळ पुन्हा निवडून आल्यामुळे मुंबईची मागणी कितपत मान्य होईल, याबद्दल साशंकता आहे. दरवर्षी संमेलनाचा खर्च वाढत चालल्याने ‘भक्कम आर्थिक शक्ती असलेली राजकीय छत्री’ हा घटक निर्णायक ठरणार आहे. अशी छत्री ठाणे व पुण्यात नक्की आहे. याशिवाय संमेलनाध्यक्ष पदासाठी भालचंद्र नेमाडे व रंगनाथ पठारे यांची नावे चर्चेत आहेत.
...तर संमेलन नागपूरला?
ठाणे की पुणे रस्सीखेच वाढली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले निर्णायक मत वापरून शंभरावे साहित्य संमेलन नागपूरला नेऊ शकतात.
९९ वे साहित्य संमेलन अद्याप पार पडायचे आहे. त्यामुळे शंभरावे संमेलन कोणत्या शहरात होईल, त्याचे यजमानपद कोणाला मिळेल, याबाबत सध्या चर्चा करणे योग्य ठरणार नाही. महामंडळाची एक स्पष्ट आणि अनुशासित प्रणाली आहे. त्यानुसार हा निर्णय महामंडळ घेईल.- मिलिंद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ