केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 10:59 IST2025-05-18T10:58:09+5:302025-05-18T10:59:53+5:30

मान्सूनच्या चार महिन्यांचे पूर्वानुमान देतानाच प्रत्येक महिन्यात किंवा प्रत्येक पंधरवड्यात कुठे किती पाऊस पडेल? हे कोणत्याच आधारावर सांगता येत नसले तरी तुलनेने लवकर येणारा मान्सून बळीराजाच्या पदरात वारेमाप पाऊस देणार असून, पाणीसाठाही पुरेपूर होण्यास मदत मिळणार आहे.

The clouds will give abundant rain | केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार

केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार

कृष्णानंद होसाळीकर , हवामान तज्ज्ञ -

केरळात वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा मान्सून यंदा महाराष्ट्रातही लवकर दाखल होणार आहे. केरळमध्ये अंदाजे २७ मे रोजी मान्सून (चार दिवस कमी-अधिक) दाखल होईल, अशी सरासरी तारीख अपेक्षित धरली तरी राज्यात मान्सून कोणत्या क्षणी दाखल होईल, अशी तारीख देता येत नाही. त्यास अनेक कारणे असले तरी यंदा राज्यात मान्सून भरभरून कोसळणार असल्याचे संकेत आहेत. 

यंदाच्या चार महिन्यांत प्रत्येक महिन्याला, प्रत्येक आठवड्याला पाऊस चांगला असेल, असे गृहीत धरणे योग्य नाही. कारण, विस्तृत पूर्वानुमान गृहीत धरले असले तरी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी समन्वय ठेवून शेतीच्या कामाचे नियोजन करणे अपेक्षित आहे. रेड, ऑरेंज अलर्टवर शेतकऱ्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तीन ते चार तासांच्या पावसावरही शेतकऱ्यांनी लक्ष ठेवून स्वत:ची आणि पशुधनाची काळजी घेणे गरजेचे आहे. कृषी विभाग आणि हवामान विभाग यांची जोड कायमच शेतकऱ्यांसोबत असून, आता हवामान विभागाने ब्लॉकस्तरीय अंदाज आणि पंचायत स्तरावर सल्ले देण्यास सुरुवात केली आहे.

मौसम ॲप, मेघदूत ॲप आणि दामिनी ॲपसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतानाच शेतकऱ्यांनी थोडासा माहिती तंत्रज्ञानाची जोड घेण्याची गरज आहे. जेणेकरून पावसाचा खंड आणि पावसाचे वितरण शेतकऱ्यांना मोबाइलवर शक्य आहे. हवामान विभागाचा मानस प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा आहेच. मात्र संपूर्ण चार महिने पाऊस कसा असेल? हे सांगता येत नाही. कारण, पावसाचे टप्पे असतात. जून महिना हा संक्रमणाचा काळ असतो. जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने महत्त्वाचे असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभागाशी संपर्क राहून शेतीचे नियोजन केले पाहिजे.

यंदा पाऊस चांगला आहे ही चांगली बाब आहे. तसे पूर्वानुमान आहेच. मात्र, ते शेतकऱ्यांपर्यंत कधी कधी पोहोचत नाही, ही वस्तुस्थिती असली तरी शेतकऱ्यांनी स्वयंघोषित हवामान तज्ज्ञांवर अवलंबून राहण्यापेक्षा आयटीची जोड घेत शेतीचे नियोजन करणे गरजेचे आहे. दरम्यान, आता मान्सून मॉड्यूलनुसार, यंदा मान्सून जून महिन्याच्या अखेरपर्यंत राज्य व्यापले, असा अंदाज आहे. शिवाय यंदाच्या मान्सून अल निनो नाही. ला निना आता न्यूट्रल झाला आहे. या सगळ्या गोष्टी तटस्थ असल्या तरी ग्लोबल मॉड्यूल असे दर्शवित आहेत की पावसाचे चार महिने चांगले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यंदा राज्यातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाचा आधार आहे. शेतकऱ्यांनी हवामान विभागाकडून माहिती घ्यावी. दिशाभूल करणारी माहिती घेऊ नये. शेतीच्या कामासाठी आयटीची जोड घ्यावी. यंदाचा मान्सून शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरेल, ही शक्यता नाकारता येत नाही. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांना निश्चित यंदा चांगला पाऊस असून, तो फास्ट ट्रेनसारखा असणार आहे, यात तिळमात्र शंका नाही.

Web Title: The clouds will give abundant rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.