'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
By योगेश पांडे | Updated: October 10, 2025 22:33 IST2025-10-10T22:32:45+5:302025-10-10T22:33:22+5:30
Mohan Bhagwat News: भोसले घराणे आणि संघातील ऋणानुबंध हे राजे लक्ष्मणराव भोसले आणि डॉ. हेडगेवार यांच्या काळापासून आहे. शिवाजी महाराजांनी दिलेली प्रेरणा भोसले घराण्याच्या माध्यमातून नागपुरात रुजली आणि म्हणूनच कदाचित या मातीतून संघ जन्माला आला असावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले

'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
- योगेश पांडे
नागपूर - भोसले घराणे आणि संघातील ऋणानुबंध हे राजे लक्ष्मणराव भोसले आणि डॉ. हेडगेवार यांच्या काळापासून आहे. शिवाजी महाराजांनी दिलेली प्रेरणा भोसले घराण्याच्या माध्यमातून नागपुरात रुजली आणि म्हणूनच कदाचित या मातीतून संघ जन्माला आला असावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. उदय जोशी लिखित आदिपर्व, संघर्षपर्व, कलहपर्व आणि ऱ्हासपर्व तसेच डॉ. हरदास यांची महालची भ्रमंती आणि धर्मभूषण श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले ही सहा पुस्तके शुक्रवारी प्रकाशित करण्यात आली. यावेळी सरसंघचालक बोलत होते.
महालातील सीनियर भोसला पॅलेस येथे हा कार्यक्रमाला अंजनगाव सुर्जी येथील श्रीनाथ पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, श्रीमंत मुधोजी राजे भोसले, लाखे प्रकाशनचे संचालक चंद्रकांत लाखे, लेखकद्वय उदय जोशी आणि डॉ. भालचंद्र हरदास प्रामुख्याने उपस्थित होते. आपलेपणा विसरल्यामुळे आपला समाज विभाजित होत होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मित्र जोडून सामर्थ्य उभे केले. आपल्या मातीबद्दलचा, देशाबद्दलचा शिवाजी महाराजांचा विचार जोपर्यंत प्रभावी होता, तोपर्यंत आपला इतिहास सरशीचा होता. महाराजांच्या या आपलेपणाच्या प्रेरणेचे स्मरण ठेवले पाहिजे. भारतावर अनादी काळापासून सातत्याने हल्ले होत राहिले. परंतु, कुठलाही परकीय आक्रांता एक रात्र देखील स्वस्थपणे झोपू शकला नाही. परकीय आक्रमकांनी या देशात पाऊल ठेवल्यापासून त्यांना कायम विरोध होत होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रयोगाला मिळालेल्या यशाचे देशातील इतर राजकारण्यांनी अनुकरण केले. ही परंपरा शेवटपर्यंत चालविण्याचे काम नागपूरकर भोसल्यांनी केले. अप्पासाहेब भोसलेंनी काबुल-कंदहार पर्यंत इंग्रजांच्या विरोधात दिलेला लढा हे त्याचेच द्योतक होते, असे सरसंघचालक म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा उंबरठा नागपुरात आहे याचा आम्हाला अभिमान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेसाठी भोसल्यांच्या वाड्याचे प्रांगण खुले करून दिले होते. भोसल्यांच्या घराला अनेक संतांचा आशीर्वाद लाभला आहे असे प्रतिपादन जितेंद्रनाथ महाराजांनी केले.
भोसल्यांच्या घराण्याचा हा इतिहास सर्व भाषेत लोकांसमोर यायला हवा. भोसले घराणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच श्रीनाथ पीठाचे गुरू घराणे यांचे संबंध या पुस्तकांमधून अधोरेखित होत आहेत, असे मुधोजीराजे भोसले म्हणाले. डॉ. हरदास यांनी महालचे वैशिष्ट्य, भोसले घराण्याचे आणि संघाचे संबंध तसेच पुस्तकाच्या रचनेबद्दल माहिती दिली. प्रकाश एदलाबादकर यांनी संचालन केले.