मुंबई : अर्थसंकल्पात जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक असून, सरकारने ३० सप्टेंबर २०२५ ची अट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. गुरुवारी अर्थसंकल्पाच्या विभागवार चर्चेदरम्यान विधानसभेत बोलताना त्यांनी शेती, सिंचन आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारवर टीका केली.
वडेट्टीवार म्हणाले, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज २ लाखांच्या वर आहे, त्यांना लाभ कसा मिळणार? आधी त्यांनी वरची रक्कम भरावी आणि मग तुम्ही २ लाख देणार का? सरकारने ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? शेतकरी कर्जमाफीचे नेमके निकष काय आहेत, याची स्पष्टता आली पाहिजे.
धान शेतकरी अडचणीत
विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची मागणी होती. मात्र, अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख नाही. तसेच धान खरेदीचा कोटा संपल्याने शेतकरी अडचणीत असून हा कोटा वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली. अतिवृष्टीनंतर केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळालेली नाही, याकडेही लक्ष वेधले.
पोलिस भरतीवर प्रश्नचिन्ह
अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनींची, ढासलेल्या विहिरी यांची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. राज्यात दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरीही सरकार ५०० कोटी खर्च करून बीकेसीमध्ये ‘एआय कृषी महोत्सवा’चे इव्हेंट करण्यात मग्न आहे, यातून काय साध्य झाले? असा सवालही त्यांनी यावेळी केला. राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून पोलिस भरतीतही अनियमितता होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Web Summary : Vadettiwar criticized the government's farmer loan waiver as a betrayal with conditions. He questioned the scheme's specifics, demanded clarity, raised concerns about paddy farmers' bonus, and criticized the law and order situation.
Web Summary : वडेट्टीवार ने सरकार की किसान ऋण माफी को शर्तों के साथ विश्वासघात बताया। उन्होंने योजना की बारीकियों पर सवाल उठाया, स्पष्टता की मांग की, धान किसानों के बोनस पर चिंता जताई और कानून व्यवस्था की स्थिति की आलोचना की।