...म्हणूनच वाल्मीक कराडला शरणागती पत्करावी लागली; CM फडणवीसांनी इतर आरोपींनाही दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:06 IST2024-12-31T16:04:35+5:302024-12-31T16:06:25+5:30
तीन आठवड्यांपासून फरार असलेला वाल्मीक कराड अखेर सीआयडीला शरण आला. पुण्यात वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.

...म्हणूनच वाल्मीक कराडला शरणागती पत्करावी लागली; CM फडणवीसांनी इतर आरोपींनाही दिला इशारा
खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे आरोप होत असलेला वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला. पुण्यात वाल्मीक सीआयडी कार्यालयात जाऊन वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केले. त्यानंतर या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही आणि कोणालाही सोडणार नाही, असा इशारा फडणवीसांनी दिला.
मुंबई माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, बीडच्या प्रकरणात कुणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा, ज्या ज्या प्रकरणात संबंध आढळेल; त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही", असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
"कोणालाही अशा प्रकारची हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे. त्यामुळेच आज त्यांना (वाल्मीक कराड) त्याठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतील जे आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम या कामाला लागल्या आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही. सगळ्यांना शोधून काढू", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीसांची धनंजय देशमुखांशी चर्चा
मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
"आज (३१ डिसेंबर २०२४) स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माझी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की, तुम्ही काळजी करू नका. काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाहीत, तोपर्यंत सगळी कारवाई पोलीस करतील, हा विश्वास मी त्यांना दिला आहे", असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.