Maharashtra Politics: “३२ वर्षीय आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाला शिंदे-भाजप सरकार घाबरले, वरळीत मोदी सेना...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 14:33 IST2023-02-07T14:33:06+5:302023-02-07T14:33:41+5:30
Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानानुसार मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊनच वरळीत येऊन दाखवावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: “३२ वर्षीय आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाला शिंदे-भाजप सरकार घाबरले, वरळीत मोदी सेना...”
Maharashtra Politics: आताच्या घडीला देशासह राज्यातील राजकीय वातावरण विविध मुद्द्यांवरून तापलेले पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष वाढताना दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करत आहेत. यातच ३२ वर्षीय आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाला शिंदे-भाजप सरकार घाबरले, या शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांचे पाय वरळीला लागतायत, याचा आनंद आहे. परत सांगतो, राजीनामा देऊन येण्याची वाट पाहतो. ३२ वर्षाच्या तरुणाला सरकार कसे घाबरते, हे वरळीत महाराष्ट्र पाहिले. आम्ही मोदींची माणसे आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कवचकुंडलात वरळीत मोदी सेना येणार आहे, असा खोचक टोला संजय राऊतांनी यावेळी बोलताना लगावला.
राजीनामा देऊनच वरळीत येऊन दाखवावे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वरळीत येणार आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानानुसार त्यांनी राजीनामा देऊनच वरळीत येऊन दाखवावे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. तसेच नारायण राणे राज्यपाल होऊ शकतात, या चर्चांवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, नियम आणि कायद्यानुसार, एखाद्या राज्याचा नागरिक, त्याच राज्याचा राज्यपाल होऊ शकत नाही. या देशात आणि राज्यात अनेक गोष्टी घटनाबाह्य होत असतात, असे काही घटनाबाह्य कृत्य केले असेल तर आम्ही त्या नावाचे स्वागत करू, मजा येईल, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आदित्य ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा द्या. जनतेत उतरून निवडणूक लढवून दाखवा. तुम्ही ठाण्यात लढणार असाल मी ठाण्यात येतो अन्यथा माझ्या वरळी मतदार संघात माझ्याविरुद्ध लढवून दाखवा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"