“कायद्याने १६ आमदार अपात्र होत आहेत, विधानसभा अध्यक्षांची कृती...”; संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 15:33 IST2023-08-03T15:21:56+5:302023-08-03T15:33:31+5:30

Sanjay Raut News: आम्हाला आता सरन्यायाधीशांकडून काही अपेक्षा आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

thackeray group sanjay raut reaction over mla disqualification case | “कायद्याने १६ आमदार अपात्र होत आहेत, विधानसभा अध्यक्षांची कृती...”; संजय राऊतांचा दावा

“कायद्याने १६ आमदार अपात्र होत आहेत, विधानसभा अध्यक्षांची कृती...”; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut News: आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपविल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता शिवसेनेच्या ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. मात्र, या नोटिसांना उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली असून, कायद्याने १६ आमदार अपात्र असल्याचा दावा केला आहे. 

शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याच्या कार्यवाहीला विलंब होत असल्याचा दावा ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेत विधानसभा अध्यक्षांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या ४० आमदारांना उत्तर देण्यास मुदतवाढ दिली. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी निशाणा साधला. 

विधानसभा अध्यक्षांची कृती...

सर्वोच्च न्यायालयात आमची २ प्रकरणे सध्या सुरू आहेत. न्यायालयाने आधीच अध्यक्षांना निर्देश दिले आहेत. ११ ऑगस्ट रोजी याला ३ महिने पूर्ण होत आहेत. विधानसभा अध्यक्ष ज्या अर्थी वेळ लावत आहेत. त्या अर्थी कायद्याने हे सर्व आमदार अपात्र होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल असे वाटत आहे. आम्हाला आता सरन्यायाधिशांकडून काही अपेक्षा आहेत. अनेक घटनात्मक पदे दबावात काम करत आहेत, हे आपण वारंवार पाहिले आहेच, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

दरम्यान, सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सर्व आमदार हे अधिवेशनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितल्याचे समजते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. आम्हाला दोन आठवड्याची मुदतवाढ दिलेली आहे. दोन आठवड्यात आम्ही आता उत्तर देणार आहोत, असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले होते.


 

Web Title: thackeray group sanjay raut reaction over mla disqualification case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.