“वचनभंग केला, नैतिकतेच्या मुद्द्यावर अजित पवारांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 18:24 IST2025-03-30T18:22:44+5:302025-03-30T18:24:14+5:30
Thackeray Group Sanjay Raut News: लाडक्या बहिणींची फसवणूक चालली आहे. शेतकऱ्यांना गंडवले जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“वचनभंग केला, नैतिकतेच्या मुद्द्यावर अजित पवारांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे”: संजय राऊत
Thackeray Group Sanjay Raut News: बीड प्रकरण, परभणी प्रकरण, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलची आक्षेपार्ह विधाने, अशा काही मुद्द्यांवरून विरोधक महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून, सातत्याने महायुती सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीची भाषा, तसेच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची भाषा वेगळी होती. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ इथपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच. ‘च’वर जोर देऊन हे तिन्ही नेते बोलत होते. आता अजित पवारांनी हात वर केले आहेत. अजित पवार कर्जमाफी करु शकत नसतील, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. राज्यातील जनतेल्या दिलेल्या वचनांचा भंग केल्याबद्दल नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
लाडके भाऊ आहात ना? मग देवगिरीवर जाऊन उपोषणाला बसले पाहिजे
अजित पवार आणि त्यांच्या पक्षाने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ कर्जमाफी देऊ या घोषणा केल्या तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे होते. त्यामुळे ही जबाबदारी एकनाथ शिंदेंची जास्त आहे. एकनाथ शिंदे वचन पूर्ण कसे करणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आता नाही म्हणत आहेत. एकनाथ शिंदेंनी एक करावे, जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाहीत आणि लाडक्या बहिणींना २१०० रुपये देत नाहीत, तोपर्यंत मी देवगिरी बाहेर उपोषणाला बसेन अशी भूमिका घ्यावी. लाडके भाऊ आहात ना? मग त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी उपोषणाला बसले पाहिजे, असा खोचक सल्ला संजय राऊतांनी दिला.
दरम्यान, प्राण जाए पर वचन न जाए हे करुन दाखवले पाहिजे. मराठा माणसाची, शिवसैनिकाची ही भूमिका असते. एकनाथ शिंदेंच्या डोळ्यांसमोर लाडक्या बहिणींची फसवणूक चालली आहे. शेतकऱ्यांना गंडवले जात आहे, तुम्ही सरकारमध्ये बसून काय करत आहात? अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यासमोर उपोषणाला बसा, आंदोलन करा. शिवसैनिक असाल तर शिवसेनेचा खरा आत्मा हा आंदोलन आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.