“२०२९ला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणुका लढणार अन् ते मुख्यमंत्री बनणार”: चंद्रकांत खैरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 18:45 IST2025-04-07T18:40:30+5:302025-04-07T18:45:59+5:30
Shiv Sena Thackeray Group Chandrashekhar Khaire News: २०२९ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ठाकरे गट आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात लढवणार असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

“२०२९ला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणुका लढणार अन् ते मुख्यमंत्री बनणार”: चंद्रकांत खैरे
Shiv Sena Thackeray Group Chandrashekhar Khaire News: रावसाहेब दानवे हे विचित्र माणूस आहेत. आता म्हणतात आम्ही काँग्रेससोबत गेलो, उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले. पण बाळासाहेब ठाकरे यांची ही कडवट शिवसेना, उद्धव ठाकरे आता पुढे घेऊन जात आहेत. आमच्यासारख्या कडवट शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे जोमाने काम करत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी आमच्या काही लोकांना पैसे वाटले. त्यांच्या पक्षातीलही काही जणांना पैसे वाटले आणि माझा पराभव केला. हाच तुमचा प्रामाणिकपणा आहे का, अशी विचारणा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.
एक काळ असा होता की जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार आणि भारतीय जनता पार्टीकडून मी एकटाच आमदार होतो. मात्र, आता काळ असा आहे की, भाजपाचे ३ आमदार आणि शिवसेनेचे २ आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कोणी आहे का? एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी ताकद होती. पण त्यांच्या वागण्यामुळे आणि व्यवहारामुळे लोक त्यांच्या विचारापासून दूर गेले. त्यामुळे काँग्रेस जवळपास संपुष्टात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्ष संपुष्टात आला आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहत नाही, असा दावा भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता. याबाबत पत्रकारांनी चंद्रकांत खैरे यांना प्रतिक्रिया विचारली. याला उत्तर देताना चंद्रकांत खैरे यांनी आदित्य ठाकरेंबाबत मोठा दावा केला.
२०२९ला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणुका होतील अन् ते मुख्यमंत्री बनतील
मी अजूनही त्या माणसाचे तोंड पाहिलेले नाही. मी त्या माणसाशी बोलतही नाही. त्यांनी युतीचा खासदार पाडला. आता परमेश्वराने या निवडणुकीत त्यांना दाखवून दिले. बदला निघतो, बदला थांबत नाही. भाजपाच्या पक्ष शिस्तीत एका घरात एकच तिकीट आहे. पण यांनी दोन तिकिटे पदरात पाडून घेतील. शिंदे गटातून मुलीला उभे केले असेल, तरी त्यांची युतीच आहे ना. परंतु, आता पुढे शिवसेनाच त्या ठिकाणी येणार आहे. तुम्ही २०२९ च्या निवडणुकीत काय होते ते पाहा. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वखाली त्या निवडणुका होतील आणि ते मुख्यमंत्री बनतील, असा मोठा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.
दरम्यान, हे आता कोणी कुठेच दिसणार नाहीत. सरकार येते आणि जाते. अमेरिकेत ट्रम्प कसे वागत आहेत, तिथे त्यांच्याविरोधात तेथील सर्व राज्यातील लोक रस्त्यावर उतरली आहेत. इथेही तेच होणार आहे. असेच वागत राहिले तर अध:पतन नक्की होणार आहे. भीमाचे गर्वहरण हनुमंतांनी केले, तर हे लोक कोण आहेत. भाजपाचे स्थानिक मंत्री दानवेंना विचारत नाहीत. बळजबरीने त्यांनी घुसखोरी केली आहे. बाकी काही त्यांचे आता राहिलेले नाही, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.