"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 06:54 IST2025-10-18T06:52:58+5:302025-10-18T06:54:21+5:30
ओबीसीसोबत असल्याचे सांगायचे अन् दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी दुटप्पी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतल्याचा व्हिडीओ यावेळी दाखवला. वडेट्टीवारांनी भूमिका स्पष्ट करावी, असे भुजबळ यावेळी म्हणाले.

"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
बीड : ओबीसींच्या मुळावर उठलेल्या कोणाही समाजाच्या नेत्याला आडवे करा. ओबीसी विरोधकांना डोक्यात ठेवा, येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा हिशोब करा, असे आवाहन ओबीसी समाजाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी केले. १७ ऑक्टोबर रोजी बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित ओबीसी महाएल्गार सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर आ. धनंजय मुंडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. मनोज कायंदे, प्रा. मनोहर धोंडे, प्रा. लक्ष्मण हाके, लक्ष्मण गायकवाड, पंकज भुजबळ, शब्बीर अन्सारी आदी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले की, मुंबईत सरकारने नरमाईने घेतले. जीआर निघाला. आम्ही कोर्टात गेलो, तेथे न्याय मिळण्याची खात्री आहे. आता आम्ही न्यायदेवतेकडे आणि रस्त्यावर दुहेरी लढाई लढणार आहोत.
विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा -
ओबीसीसोबत असल्याचे सांगायचे अन् दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी दुटप्पी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतल्याचा व्हिडीओ यावेळी दाखवला. वडेट्टीवारांनी भूमिका स्पष्ट करावी, असे भुजबळ यावेळी म्हणाले.
विखे आले आणि विखार पसरवून गेले : यावेळी भुजबळ यांनी विखे पाटील यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, विखे पाटलांनाही सोडणार नाही, उलटेसुलटे आदेश दिले. आम्ही कोर्टात, रस्त्यावर लढू. ओबीसी समाजाने मनात आणले तर नेत्यांना सतरंजी उचलायला लावतील, असा इशाराही त्यांनी दिला. सकाळी अर्ज केला, त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळते. अधिकारी इतके फास्ट कसे झाले, अशी टिपणी करत भुजबळ म्हणाले, जिथे ८-१० महिने लागतात, तिथे दहा तासात प्रमाणपत्र कसे? असा प्रश्न भुजबळ यांनी केला.
विरोध करायचा म्हणून नाही आणि न्यायी आरक्षणाच्या विरोधातही नाही, ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी महाएल्गार मेळाव्यात उभा असल्याचे आ. धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.