तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण नाट्याचं गौडबंगाल; अनेक प्रश्न अनुत्तरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 09:11 IST2025-02-13T09:10:59+5:302025-02-13T09:11:24+5:30
अपहरणाची गोष्ट सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास सुरू झाली. अवघ्या पाच तासांत ऋषिराज बँकॉकला जात असताना अंदमानपासून सुखरूप रात्री नऊच्या सुमारास पुण्यात आला.

तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण नाट्याचं गौडबंगाल; अनेक प्रश्न अनुत्तरीत
पुणे - माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत अपहरण नाट्यातील प्रत्येक घडामोडीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुळात खरंच सावंत कुटुंबीयांना मुलगा बँकॉकला जाणार आहे, हे माहिती नव्हते? ज्यावेळी ऋषिराज मित्रांसोबत आहे हे तानाजी सावंत पत्रकार परिषदेत सांगतात, त्यावेळी चार्टर्ड परत पुणे विमानतळावर बोलावण्याएवढे हे प्रकरण गंभीर होते का? पोलिसांनीदेखील कोणतीही पडताळणी न करता तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल कसा केला? यासाठी पोलिसांवर दबाव होता का? असे एक ना अनेक प्रश्न या अपहरण नाट्यानंतर उपस्थित होत आहेत.
तक्रार देण्याचे कारण काय?
ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याची फिर्याद देणारे जेएसपीएम शिक्षण संस्थेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख राहुल सुभाष करळे (४७, रा. सावंत विहार, मोरे बागेजवळ, कात्रज) यांनी कुणाच्या सांगण्यावरून ही तक्रार दिली. जर ऋषिराज कारमध्ये बसून संस्थेच्या कार्यालयातूनच बाहेर पडले होते तर, तक्रार देताना भारतातून अपहरण केल्याची तक्रार देण्याचे कारण काय? हे प्रश्नदेखील महत्त्वाचे आहेत.
तानाजी सावंतांची चुप्पी
अपहरणाची गोष्ट सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास सुरू झाली. अवघ्या पाच तासांत ऋषिराज बँकॉकला जात असताना अंदमानपासून सुखरूप रात्री नऊच्या सुमारास पुण्यात आला. या पाच तासांत यंत्रणेने ज्याप्रमाणे ‘चोख’ काम केले, ते कशामुळे? सावंतांनी मुख्यमंत्री कार्यालयापासून, उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, पोलिस आयुक्त, सहपोलिस आयुक्त या सगळ्यांना फोनाफोनी करून स्वत: पोलिस आयुक्तालयात ठिय्या मांडला होता.
विमानाचे ७८ लाख ५० हजार रुपये कसे भरले?
ऋषिराज यांनी चार्टर्ड प्लेन विमानाचे ७८ लाख ५० हजार रुपये ‘आरटीजीएस’द्वारे भरले होते. ही रक्कम कशी अदा झाली, याचीह माहिती गुन्हे शाखेकडून घेण्यात येणार आहे. ‘क’ समरी अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर दाखल झालेला अपहरण प्रकरणाचा गुन्हा रद्दबातल केला जाईल, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.
खासगी विमानाने मित्रांसमवेत व्यावसायिक कामासाठी बँकाँकला निघालो होतो. बँकॉकला निघाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यास ते नकार देतील. त्यामुळे त्यांना माहिती दिली नाही, असे ऋषिराज यांनी म्हटले आहे.