नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 18:33 IST2024-09-20T18:20:02+5:302024-09-20T18:33:12+5:30
आमदार सतीश चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
मुंबई: भाजपचे कोकणातील आमदार नितेश राणे हे सातत्याने धार्मिक वाद वाढेल अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. वारंवार धार्मिक द्वेष वाढवणारी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, नितेश राणेंच्या वक्तव्यांची तक्रार दिल्लीत करणार असल्याचे देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून राणेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "महाराष्ट्रामध्ये येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर केवळ स्वतःचे राजकारण करण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. यामुळे मुस्लिम समाजात संतापाची भावना आहे", असे सतीश चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.
तसेच, याबाबत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र असे असताना देखील ते पुन्हा तशाच पद्धतीची वक्तव्ये करीत आहेत. यामुळे दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल अशी सामाजिक परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्यातून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे यासंदर्भात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने देखील त्यांच्या समाजविघातक वक्तव्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी ही विनंती, अशी मागणी सतीश चव्हाण यांनी केली आहे.
आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली...#Sach#SatishChavan#Gangapur#Khultabadpic.twitter.com/eiXu9lCAn8
— Satish Chavan (@satishchavan55) September 20, 2024
दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे गेल्या काही महिन्यांपासून जाहीर सभांमध्ये धार्मिक द्वेष पसरविणारी, चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत. त्यानंतर गुरुवारी (दि.१९) रोजी नितेश राणे यांनी सांगलीतील बत्तीस शिराळा येथे एका भाषणात चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्यामुळे अजित पवार यांनी महायुतीमधील शिंदे गट व भाजपमधील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे म्हणत अजित पवार यांनी वाचाळवीर नेत्यांना सुनावले आहे. याबाबत ते दिल्लीला भाजप श्रेष्ठींकडे तक्रार करणार आहेत.
याबाबत भाजप आमदार नितेश राणे यांनीही देखील भाष्य केले आहे. हिंदू समाजाने एकत्रित आले पाहिजे. एकजूटपणा दाखवला पाहिजे. हिंदू समाज एकत्रित आल्यावर काय करू शकतो हे आपण दाखवून दिले पाहिजे. आम्ही सरकारमध्येच बसलोय. हे हिंदूंचे सरकार आहे. हे हिंदू राष्ट्र आहे. इथे भगवाच फडकणार. अजित पवारांना कुठे तक्रार करायची ती करुद्यात. मी माझ्या हिंदुत्वाशी अजितबत तडजोड करणार नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.