Swami Govind Dev Giri Maharaj: ज्यांना कधी संघ ही पटला नव्हता, ज्यांना कधी हिंदुत्वही पटले नव्हते, अशा लोकांची आयात केली गेली. यामुळे गंगा जशी नाल्यांनी प्रदूषित झाली, तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSSही प्रदूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सावध राहिले पाहिजे, असे म्हणत रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी भारतीय जनता पक्षाचे अप्रत्यक्षपणे कान टोचले.
या शताब्दी वर्षामध्ये पूज्य डॉक्टरांपासून अनेक प्रचारकांची जी नावे समोर येतात, त्याने डोळे भरून येतात. या लोकांनी जे तप केले, जो त्याग केला, त्या तपाला आणि त्यागाला न्याय द्यायचा असेल, तर यापुढचा देश टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी संघाने सावध राहायला हवे, असे मला कधीकधी वाटते. याचे कारण संघाच्या व्यापक झालेल्या कार्यात वेगवेगळ्या मार्गाने जी आयात केलेली मंडळी येतात, त्यांचे संस्कार वेगळे आहेत. ज्यांना कधी संघ पटला नाही, हिंदुत्व पटले नाही, त्यांना नैतिकता कशाशी खातात, हे कळलेच नव्हते. या लोकांची आयात फार मोठ्या प्रमाणात झाली. गंगा तर शुद्ध आहे, पण गंगेतील नाल्यांनी ती प्रदुषित केली. त्यामुळे संघ परिवार प्रदुषित होण्याची शक्यता मला वाटते, असे स्वामी गोविंददेव गिरी यांनी म्हटले आहे.
काही पथ्यांचे पालन केले तर निश्चितपणे आपला देश मृत्यूंजय करेल
काही पथ्यांचे पालन केले तर निश्चितपणे आपला देश मृत्यूंजय करेल, तो करणार आहे, याचा मला विश्वास आहे. मृत्युंजय देशासाठी संघ आणि हिंदुत्व आवश्यक असून संघ परिवाराने सावध राहण्याची आवश्यकता आहे. प्राचीन ते मध्ययुगीन काळात भारतावर वेगवेगळ्या शक्तींची, परकीयांची मोठी आक्रमणे झाली, अनेक संकटे आली, मंदिरे पाडली, विद्यापीठे उध्वस्त केली, हिंदूत्वावर आघात केला. परंतु, संघाने योजनाबद्ध पद्धतीने प्रतिकार केला. देशाची संस्कृती, आंतरिक सजीवता कायम ठेवली आहे. त्यामुळे भारत देशाला कोणीही संपवू शकले नाहीत. इतकेच नव्हे, तर संघाला संपविण्याचा तीनवेळा प्रयत्नही केला. हीच विरासत सांभाळून देशाला पुढे न्यायचे आहे, असेही ते म्हणाले.
हिंदूंची संख्या कमी झाली तर काय करणार?
जगाच्या इतिहासात काही धर्मांध शक्तींनी अनेक धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली. परंतु, जगाच्या पाठीवर भारतच असा एकमेव देश आहे, ज्याने हिंदूत्वाची आस्था, प्रेरणा असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर पुन्हा त्याच ठिकाणी उभारले आहे. यापूर्वी देशाच्या सीमांचा संकोच झाला; पण यापुढे संकोच नको. पण हिंदूंची संख्या कमी झाली तर काय करणार? समाजाला लागलेली कीड शोधताना हिंदूंची संख्या कमी होणार नाही हे भान ठेवावे लागणार आहे. जग सुखी हवे असेल तर समर्थ भारतासाठी हिंदू पाहिजे, असे स्वामी गोविंददेव गिरी यांनी नमूद केले.