Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा घणाघात; मालवण प्रकरणी नारायण राणेंसह देवेंद्र फडणवीसांना धरलं धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 14:22 IST2024-08-29T14:13:12+5:302024-08-29T14:22:21+5:30
Sushma Andhare Slams Narayan Rane And Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार घणाघात केला आहे.

Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा घणाघात; मालवण प्रकरणी नारायण राणेंसह देवेंद्र फडणवीसांना धरलं धारेवर
राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेले युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे व भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला. एकमेकांवर दगडफेक, चिखलफेक, धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. यात एक पोलीस कर्मचारी आणि एक महिला जखमी झाली आहे. दीड तासानंतर तणाव निवळला. यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार घणाघात केला आहे.
मालवण प्रकरणी सुषमा अंधारे यांनी नारायण राणेंसह देवेंद्र फडणवीस यांनाही धारेवर धरलं आहे. "काल शिवसेनेने आंदोलन केलं त्याठिकाणी पोलिसांवर नारायण राणे यांचे गुंड भारी पडले. सरकारला आंदोलन हाताळता येत नाही, सरकार आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करतं. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करतात. देहू आळंदीमध्ये वारकऱ्यांवर हल्ला केला जातो. बलात्कार झाला म्हणून पालक जात विचारायला गेले तर पालकांना देखील लाठीचार्जला सामोरं जावं लागतं. याचा अर्थ असा आहे सरकारला आंदोलन हाताळता येत नाही."
"छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या वतीने एक पत्रकार परिषद घेऊन सर्वांच्या प्रश्नांना उत्तर देणे अपेक्षित होतं. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी ४ डिसेंबर २०२२ ला पत्र लिहून कळवलं होतं. जर त्यांनी परवानगी दिली नसेल तर घाघाईने पुतळा का उभा केला? या पुतळ्यात जाणीवपूर्वक विकृती करण्याचा प्रयत्न आपटेनी केला. हा आपटे सनातन प्रभात अशी संबंधित आहे."
"पुतळा उभा करू शकत नाही, अशा माणसाला हे काम का दिलं गेलं? जयदीप आपटे आणि नितेश राणे यांचा काय दोस्ताना आहे?, दोघांच्या दोस्तीमुळेच पुतळा उभा करण्याचे काम मिळालं. ये रिश्ता क्या कहलाता है यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावं. या पुतळ्याचा विकृतीकरण करण्याचं काम भाजपाने आणि मनुवादी यांनी केलं" असं म्हणत सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे.
"नारायण राव तुमचा इतिहास आम्हाला चांगला माहीत आहे. तुमचा इतिहास पोल्ट्री फार्मपासून आम्हाला माहीत आहे. कणकवलीला गुन्हेगारांचा आखाडा केलं. श्रीधर नाईकांच्या हत्येचा मुख्य आरोपी तुम्ही होता. २००९ ला तर नारायण राणे तुमचे स्वतःचे चुलत भाऊ अंकुश राणे यांचा मृतदेह सिंधुदुर्गला विकृत अवस्थेत मिळाला होता. हा तुमचा इतिहास आहे" असं म्हणत सुषमा अंधारे यांना नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.