"अजितदादांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दिलेल्या लढ्याला यश आलं"; सुषमा अंधारेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 10:44 IST2024-12-07T10:39:27+5:302024-12-07T10:44:51+5:30
महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा लढल्याबद्दल आभार अशी टीका अजित पवारांवर करण्यात आलीय.

"अजितदादांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दिलेल्या लढ्याला यश आलं"; सुषमा अंधारेंचा टोला
Sushma Andhare Slam Ajit Pawar: दोन दिवसांपूर्वी महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडला असून उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांना दिल्लीच्या बेनामी न्यायाधिकरणाने हा दिलासा दिला आहे. २०२१ च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या त्यांच्या सर्व मालमत्तांप्रकरणी शुक्रवारी अजित पवारांना क्लिनचिट मिळाली आहे. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बेनामी मालमत्तेच्या मालकीचे आरोप फेटाळले. दुसरीकडे, ठाकरे गटाने अजित पवारांना मिळालेल्या दिलाश्यावरुन खोचक टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा लढल्याबद्दल आभार अशी टीका अजित पवारांवर करण्यात आलीय.
महायुती सरकारच्या स्थापनेनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला. २०२१ च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या त्याच्या सर्व मालमत्ता शुक्रवारी मंजूर करण्यात आल्या. अजित पवारांविरोधातील सर्व दावे दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार अपीलीय न्यायाधिकरणाने फेटाळून लावले आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी अजितदादांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याची टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
"कालच सन्माननीय अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज लगेच त्यांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सहीसलामत त्यांना परत केली. खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अजित पवारांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेलं आहे. हा लोकशाहीच्या बळकटीकरणाचा, महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्याआधी सुद्धा राहुल कणाल, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, भावना गवळी या काही चित्र विचित्र लोकांनी मोठ्या ताकदीने दिला. या सगळ्या शूरवीरांनी हा पराक्रम बजावला होता. त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने या सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हे निकाल लावायला मदत केली त्या भाजपचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा," असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
सन्माननीय अजित दादांना आणि त्यांच्यासारख्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खडतर वाट चालणाऱ्या शूरवीरांचे अभिनंदन तसेच हा प्रवास यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आभार. @ShivSenaUBT_@ShivsenaUBTCommhttps://t.co/GsJbztL1Nqpic.twitter.com/UdRvYf0mXS
— SushmaTai Andhare (@andharesushama) December 6, 2024
नेमकं प्रकरण काय?
७ ऑक्टोबर २०२१ रोजी आयकर विभागाने अनेक कंपन्यांवर छापे टाकले होते ज्यात अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बेनामी मालकीच्या काही मालमत्तेचा कथित संबंध असलेली काही कागदपत्रे सापडली होती. मात्र, आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे सांगत न्यायाधिकरणाने हे दावे फेटाळून लावले. अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा आणि मुलगा पार्थ अजित पवार यांची बाजू मांडणारे वकील प्रशांत पाटील यांनी न्यायाधिकरणासमोर युक्तिवाद केला की, त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. ॲडव्होकेट पाटील यांनी बेनामी व्यवहार बंदी कायद्याच्या योजनेचा दाखला देत पवार कुटुंब निर्दोष असून त्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय कारवाईत खेचता येणार नाही, असे न्यायाधिकरणाला सांगितले. ५ नोव्हेंबर, २०२४ रोजी, न्यायाधिकरणाने प्राप्तिकर विभागाने दाखल केलेले अपील फेटाळून, पूर्वीचा निर्णय कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी यापूर्वी जप्त केलेल्या मालमत्ता मुक्त करण्यात आल्या आहेत.