सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 06:01 IST2025-07-22T06:00:52+5:302025-07-22T06:01:24+5:30

अजित पवारांकडून घटनेची गंभीर दखल; मारहाणप्रकरणी लातूर बंद : ११ जणांवर गुन्हा दाखल 

Suraj Chavan finally expelled; Chhawa activists beaten up | सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली

सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली

मुंबई : अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घालणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणे अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांना भोवले आहे. अजित पवार यांच्या आदेशानुसार पक्षाने सूरज चव्हाण यांची पदावरून हकालपट्टी करत राजीनामा घेतला आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध करण्यासाठी रविवारी लातूर येथे सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी जाऊन निषेध नोंदवला, यावेळी त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते भिरकावले. या कृत्याने संतप्त झालेल्या सूरज चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. याच्या व्हिडीओनंतर सूरज चव्हाण यांच्यासह अजित पवार गटावर टीका होऊ लागली. चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली असून, मारहाण केलेल्या जय घाटगेंची भेट घेणार असल्याचे म्हटले होते.

‘मूल्यांच्या विरोधातील वर्तन  स्वीकारले जाणार नाही’ 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एक्स’वर याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.  त्यांनी म्हटले की, लातूरमध्ये घडलेल्या गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर सूरच चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरीत राजीनामा द्यायच्या सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो.

मारहाणप्रकरणी लातूर बंद
लातूर : छावाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील आणि कार्यकर्त्यास झालेल्या मारहाणप्रकरणी सोमवारी लातूरमध्ये सर्वपक्षीयांनी बंद पुकारला. पोलिसांनी सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर सोमवारी पहाटे गुन्हा दाखल केला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. 

बॅनर फाडले, कार्यालय जाळण्याचा प्रयत्न 
धाराशिवमध्ये छावा संघटनेने अजित पवार गटाच्या कार्यालयासमाेर  घोषणाबाजी केली. बॅनरही फाडले.  छत्रपती संभाजीनगरमध्ये संघटनांनी नेत्यांच्या प्रतिमेला आसुडाचे फटके मारत पत्त्यांची उधळण केली. बॅनर फाडले.  नांदेडमध्ये अजित पवार यांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले. जालन्यात अजित पवार गटाच्या कार्यालयावर पेट्रोल टाकून जाळपोळीचा प्रयत्न केला. सुदैवाने अनर्थ टळला.  छावा क्रांतिवीर सेनेने नाशिकमध्ये ‘जोडो मारो’ आंदोलन, घोषणाबाजी केली. 

Web Title: Suraj Chavan finally expelled; Chhawa activists beaten up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.