सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेला हल्ला, त्यांच्या अपमानाचे प्रकरण संसदेत मांडणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 20:56 IST2025-10-07T20:55:57+5:302025-10-07T20:56:44+5:30
Supriya Sule on CJI BR Gavai: सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती, बारामतीत करणार मूक आंदोलन

सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेला हल्ला, त्यांच्या अपमानाचे प्रकरण संसदेत मांडणार!
Supriya Sule on CJI BR Gavai: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. बारामतीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे आणि युवा नेते युगेंद्र पवार यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरन्यायाधीशांच्या अपमानाचे प्रकरण संसदेत मांडणार असल्याचे यावेळी सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
"देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. हा देश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालणारा आहे. कोणाच्याही मनमानीने चालणार नाही. विरोध करण्याची जी नवी पद्धत देशात सुरू झाली आहे, ती चुकीची आहे. ही प्रवृत्ती वाढू नये यासाठी आपण समाज म्हणून चर्चा केली पाहिजे. अशा घटना रोखण्यासाठी काय करता येईल यासाठी पुढील अधिवेशनात संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी मी करणार आहे," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"राज्य सरकारकडे शक्तीपीठ महामार्गासाठी ८० हजार कोटी रुपये आहेत. मात्र, शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनाचे काय झाले? लाडक्या बहिणींना पैसे का दिले जात नाहीत? आनंदाचा शिधा कुठे गेला? अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थ खात्याकडून निधी न मिळाल्याने आनंदाचा शिधा बंद झाल्याची कबुली दिली आहे. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने आनंदाचा शिधा योजना थांबवण्यात आली आहे. राज्याचे वित्तीय व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून, सरकार मोठ्या आर्थिक अडचणीत आहे असे मंत्रीच सांगताहेत. यावर सरकारने उत्तर द्यावे," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.