शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 05:23 IST2025-10-06T05:22:56+5:302025-10-06T05:23:05+5:30
महाराष्ट्रासह परप्रांतांतील कंपन्यांचा सहभाग

शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
विलास गावंडे/गणेश वासनिक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ/अमरावती : कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. कुठे बोगस औषधांचा पुरवठा झाला का, यादृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून शासकीय, निमशासकीय रुग्णालयातून औषधांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. याची विभागाच्या प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. यामध्ये स्थानिक पातळीवर खरेदी केलेली औषधी बोगस असल्याचे विश्लेषकांनी घोषित केले. खरेदी केलेले औषधे महाराष्ट्रासह परप्रांतातील कंपन्या आणि चिल्लर विक्रेत्यांनी पुरविल्या आहेत.
शासनाच्या पत्रात नावे
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षकांनी काढलेल्या निष्कर्षात संबंधित औषधांचे मूळ घटकच त्यामध्ये नसल्याची बाबही पुढे आली. औषधांची खरेदी स्थानिक पातळीवर शासकीय, निमशासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात आली.
बोगस औषधांच्या पुरवठ्यातील घाऊक विक्रेता ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील मे. एक्टिव्हेंटिस बायोटेक प्रा. लि. आहे. या वितरकाच्या घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी १५ नमुने बनावट असल्याचे आढळले. शासनाच्या पत्रात कंपन्यांची नावे देण्यात आली आहेत.
या कंपन्यांचे नमुने बोगस
मे. स्टिफन फॉर्म्युलेशन (उत्तराखंड), मे. रिफंट फार्मा प्रा.लि. (केरला), मे. म्रिष्टल फॉर्म्युलेशन्स (उत्तराखंड), मे. बायोटेक फॉर्म्युलेशन (आंध्र प्रदेश), मे. मेलवॉन बायोसायन्सेस (केरला), मे. स्काय क्यूअर सोल्यूशन्स (केरला), मे. एस. एम. एन. लॅब्स लि. देहरादून (उत्तराखंड), मे. श्री. ग. लॅब लि. डेहराडून (उत्तराखंड).
बोगस औषधी पुरविणारे चिल्लर विक्रेते
जया एंटरप्रायजेस लातूर, विशाल एंटरप्रायजेस कोल्हापूर, एक्टिवेटिस बायोटेक प्रा.लि. भिवंडी (जि. ठाणे), केंबिज जेनेरिक हाऊस मीरा रोड ठाणे, ग्लाशिअर फार्मा प्रा. लि. अमरावती, राजेश फार्मा प्रा. लि. अमरावती, मिल्टन जनरिक प्रा.लि. कालबादेवी रोड मुंबई, श्री गणेश फार्मा अँड सर्जिकल एलएलपी मीरा रोड ठाणे याशिवाय पुणे येथील प्रतिमानगरातील प्रतिमा फार्मास्युटिकल यांची औषधेही बनावट असल्याचे आढळले.
आरोग्य यंत्रणेला अलर्ट
आरोग्य विभागाने ई-निविदाअंती खरेदी करून औषधांचा रुग्णालयांना पुरवठा केला. त्यांचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात आले. त्यापैकी १५ नमुने बनावट आढळले, असे अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश मावेकर यांनी ४ जुलैला पत्राद्वारे आरोग्य सेवा संचालनालयाच्या आयुक्तांना कळविले.
त्याअनुषंगाने आरोग्य सेवा आयुक्तालयाचे सहसंचालक (खरेदी कक्ष) डॉ. उमेश शिरोडकर यांनी ३ ऑक्टोबरला राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे बनावट औषधीबाबत अलर्ट केले आहे. बनावट औषध पुरवठा करणाऱ्या एजन्सी, पुरवठादारांची यादीही पाठविली.
लेबल वेगळे, औषधांचे मूळ घटक नव्हते : विश्लेषकांच्या अहवालानुसार लेबल वेगळे आणि औषधांचे मूळ घटक नव्हते. औषध निरीक्षकांद्वारे झालेल्या तपासणीत औषधांच्या लेबलवर नमूद उत्पादक हे अस्तित्वात नाहीत, असे निदर्शनास आले आहे.