- दीपक भातुसेमुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी शनिवारी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड होणार आहे. ही निवड झाल्यानंतर लगेच संध्याकाळी उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांचा लोकभवनावर शपथविधी होणार आहे. सुनेत्रा पवार या राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील.
सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी पक्षाच्या आमदारांची दुपारी दोन वाजता विधानभवनात बैठक होणार आहे. या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले जाईल. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधिमंडळ पक्षनेतेपद आणि उपमुख्यमंत्रिपदावर तातडीने नियुक्ती करण्याबाबत पक्षात चर्चा झाली. ही पदे जास्त काळ रिक्त ठेवली तर वेगळ्या चर्चांना तोंड फुटेल अशी शक्यता लक्षात घेऊन पक्षाने हा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी दिवसभर यासंदर्भात राजकीय हालचाली झाल्या. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. यामुळे रिक्त होणाऱ्या जागी पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय चर्चा?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत अजित पवार यांच्याकडील वित्त आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास, क्रीडा आणि युवक कल्याण ही खाती पक्षाकडे कायम राहावीत, याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चा केली. वित्त आणि नियोजन खाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतील, अशी चर्चा आहे. मात्र, वित्त आणि नियोजन खाते आपल्याच पक्षाकडे ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही आहेत. तसेच, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त आहे. उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवेळी रिक्त असलेले हे मंत्रिपद भरण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याचेही समजते.
दिवसभरात काय घडले?राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी याबाबत प्राथमिक चर्चा केली होती. तर शुक्रवारी सकाळी पटेल, तटकरे, भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
या चर्चेनंतर शनिवारी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल असे भुजबळ यांनी जाहीरही केले. मात्र त्यावेळी सुनेत्रा पवार यांच्याशी याबाबत चर्चा झाली नव्हती. त्यामुळे दिवसभर या बैठकीबाबत संभ्रम होता. अखेर रात्री आठ वाजता बारामतीवरून याबाबत स्पष्ट होकार आल्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्याचा निर्णय झाला आणि विधिमंडळ सचिवालयाला बैठकीबाबत पत्र देण्यात आले.तसेच आमदारांना तसा निरोप देण्यास सुरुवात झाली. बैठकीसाठी आणि शपथविधीसाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार बारामतीवरून शनिवारी मुंबईत येणार आहेत.
बारामतीत पोटनिवडणूकसुनेत्रा पवार यांनी २०२४ ची लोकसभा बारामतीमधून लढली होती. यात पराभव झाल्यानंतर त्यांना पोटनिवडणुकीत राज्यसभेवर पाठवण्यात आले. आता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्यात विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून जावे लागेल. अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्या विधानसभेची निवडणूक लढवतील. ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.
अजितदादांच्या जागेवर कोणाला बसवावे हा पक्षाचा निर्णय आहे. आम्ही जनभावना आणि आमदारांचे मत विचारात घेणार आहोत. लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे. जनतेची भावना आणि सर्वांच्या भावनांच्या अनुरूप निर्णय होईल. - प्रफुल्ल पटेल, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
धार्मिक विधी झाल्यानंतर सर्व परिवाराशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ. जनतेच्या मनातले, आमदारांच्या मनातले आम्ही ठरवू. - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. शेवटी शो मस्ट गो ऑन. कुणाकडे तरी जबाबदारी देऊन पक्ष चालवला पाहिजे. - छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
Web Summary : Sunetra Pawar is set to become Maharashtra's first woman Deputy Chief Minister, succeeding her husband in the role. She will be nominated as leader of the legislative party, followed by the oath-taking ceremony. Parth Pawar is likely to be nominated for Rajya Sabha.
Web Summary : सुनेत्रा पवार महाराष्ट्र की पहली महिला उपमुख्यमंत्री बनने के लिए तैयार हैं, वह अपने पति का स्थान लेंगी। उन्हें विधानमंडल दल का नेता नामित किया जाएगा, जिसके बाद शपथ ग्रहण समारोह होगा। पार्थ पवार को राज्यसभा के लिए नामित किए जाने की संभावना है।