राज्यावर सूर्य कोपला :तापमानाचा पारा ४५ वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 08:21 PM2019-04-26T20:21:36+5:302019-04-26T20:35:30+5:30

गेले काही दिवस तापमानात सातत्याने वाढ होत असून, शुक्रवारी (दि. २६) राज्यातील कमाल तापमानाने इतिहास रचला.

The sun rises on the state : temperature on 45 | राज्यावर सूर्य कोपला :तापमानाचा पारा ४५ वर 

राज्यावर सूर्य कोपला :तापमानाचा पारा ४५ वर 

Next
ठळक मुद्देपुण्यात शतकातील सर्वोच्च तापमानाची नोंद महाराष्ट्रासह मध्यभारतातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा तब्बल चार ते पाच अंश सेल्सिअसची वाढ

पुणे :  हिंदी महासागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि गुजरात आणि मध्यमहाराष्ट्रावर असलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासह मध्यभारतातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा तब्बल चार ते पाच अंश सेल्सिअसची वाढ झाल्याने राज्यात उष्म्याची लाट आली आहे. पुणे शहरात गेल्या शतकातील सर्वोच्च ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील सरासरी तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअस दरम्यान असून, अजून ही स्थिती दोन दिवस कायम राहील. त्यानंतर तापमानात किंचितशी घट होईल, मात्र राज्याचा पारा चाळीच्या आसपासच राहील असेही हवामान विभागाने स्पष्ट केले. 
गेले काही दिवस तापमानात सातत्याने वाढ होत असून, शुक्रवारी (दि. २६) राज्यातील कमाल तापमानाने इतिहास रचला. राज्यात सर्वत्र कमाल आणि किमान तापमानातही चार ते पाच अंशाची वाढ नोंदविण्यात आली. कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानाचा पारा देखील वीस अंशापुढेच राहणार आहे. त्यामुळे दिवसाबरोबर रात्र देखील उष्म्याचीच असेल. 
राज्यात अकोला येथे सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येथील किमान तापामानाचा पारा देखील २९.७ अंश सेल्सिअसवर आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात तापमान ४५च्यावर गेले असून, मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंशा दरम्यान आहे. राज्यात सर्वत्र कमाल तापमानाचा पारा बेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर असल्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. 
----------------

मध्य महाराष्ट्र आणि गुजरातेत जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, हिंद महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे आर्द्रता वाढून मध्य भारतातील उष्मा वाढला आहे. पुढील अठ्ठेचाळीस तास हीच स्थिती राहील. तसेच, राज्याच्या किमान तापमानाचा पारा सरासरी २३ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्यानंतर कमाल तापमानात किंचीत घट होईल. मात्र, राज्याचा सरासरी पारा हा चाळीस अंश सेल्सिअस दरम्यानच राहील. 
अरविंद श्रीवास्तव, वरिष्ठ शास्त्रज्ञ हवामान विभाग 
---------------------------
राज्यातील कमाल तापमानाचा पारा

पुणे ४२.६, लोहगाव ४२.५, अहमदनगर, ४४.९, जळगाव ४४.४, कोल्हापूर ४१, महाबळेश्वर ३६.१, मालेगाव ४३.२, नाशिक ४१.७, सांगली ४३, सातारा ४१.६, सोलापूर ४४.३, उस्मानाबाद ४३.८, औरंगाबाद ४३, परभणी ४५.७, नांदेड ४४.५, बीड ४४.२, अकोला ४६.४, अमरावती ४५.४, बुलडाणा ४३.१, ब्रम्हपुरी ४५.८, चंद्रपूर ४५.६, गोंदिया ४३.८, नागपूर ४५.२, वाशिम ४४.२, वर्धा ४५.७, यवतमाळ ४४.५ 


 

Web Title: The sun rises on the state : temperature on 45

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.