अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतोय, सगळे भिकारी...; सुजय विखेंचं धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 18:51 IST2025-01-05T18:49:46+5:302025-01-05T18:51:32+5:30

प्रसादालयात येणारा कुणीही गरीब नाही. १० रुपयेचं जेवण प्रत्येकजण खाऊ शकतो असं सांगत सुजय विखेंनी जेवणासाठी पैसे घेण्याची मागणी केली आहे.

Sujay Vikhe Patil demands that Rs 25 should be charged in Shirdi Sai Temple Prasadalaya, the entire country is eating for free | अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतोय, सगळे भिकारी...; सुजय विखेंचं धक्कादायक विधान

अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतोय, सगळे भिकारी...; सुजय विखेंचं धक्कादायक विधान

अहिल्यानगर - शिर्डी संस्थानाकडून प्रसादालयात मोफत जेवण दिले जाते. तिथे २५ रुपये आकारणी करा. त्यातून मिळणारा पैसा शिर्डीतील मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खा देश येऊन शिर्डीत फुकट जेवतोय, महाराष्ट्रातले सगळे भिकारी इथं गोळा झालेत असं धक्कादायक विधान भाजपा नेते माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. शिर्डी परिक्रमा उपक्रमाच्या नियोजनासाठी आयोजित कार्यक्रमात सुजय विखे पाटील बोलत होते. 

यावेळी सुजय विखे म्हणाले की, शिर्डी संस्थानाने याचा विचार केला पाहिजे आपण काय करत आहोत, कशासाठी करत आहोत? शिर्डी संस्थानाने बांधलेल्या शिक्षण संकुलात दर्जेदार शिक्षक का देऊ शकत नाही? उत्तम शिक्षक आले पाहिजे. पगारावर खर्च होऊ द्या पण १२ वी पास झालेल्या मुलाला उत्कृष्ट इंग्लिश बोलता आलं पाहिजे अशी शिक्षण सुविधा दिली पाहिजे अन्यथा काही उपयोग नाही. इमारतीवर, सभागृहावर खर्च केले जातात. शिकवणारा दीड लाख मागतोय तर त्याला द्या आणि गुणवत्तेवर शिक्षण द्या. तुम्ही बिनधास्त निर्णय घ्या कुणी काही करत नाही. कुणी आंदोलन केले तर त्याला सोबत घेऊ असंही त्यांनी सांगितले.

तसेच जेव्हा जेव्हा आमच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असेल तेव्हा शिर्डीतील कुठल्याही पक्षाचा माणूस तुम्हाला विरोध करणार नाही. सीबीएसईचं शिक्षण शिर्डीतील मुलांमुलींना मोफत झाले पाहिजे. माणूस शिकला तर तो योग्य मतदार होऊ शकेल. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक लावू. त्यात शिर्डीचा विकास यावर चर्चा करू. संस्थानाचा पैसा शिर्डीच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे. शिक्षण समृद्ध करा. इंग्लिश शिकवणाऱ्याला इंग्रजी येत नाही. तो मराठीत इंग्रजी शिकवतो. हे योग्य नाही. प्रसादालयात मोफत जेवण बंद करावं अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली.

दरम्यान, प्रसादालयात येणारा कुणीही गरीब नाही. १० रुपयेचं जेवण प्रत्येकजण खाऊ शकतो. जे पैसे अन्नदानात खर्च होतात तो पैसा आमच्या मुलामुलींच्या भविष्यासाठी खर्च करा हीच आमची मागणी आहे. शिर्डीच्या अर्थकारणाला चालना मिळाली पाहिजे. आपल्याला २-३ गोष्टी आवश्य कराव्या लागतील. संस्थानाचा पैसा खर्च होतोय, त्याची परतफेड या भूमीत जन्मलेल्या माणसाच्या उपजीविकेचे साधन व्हावे हे आपल्याला करायचे आहे. शिर्डीत संस्थानाकडून हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय झाला. बांधू शकता पण ही शिर्डीकरांची गरज नाही. शिक्षण संकुल जसं बांधले तसे कोचिंग सेंटर उभारून आपला मुलगा स्पर्धा परिक्षेत पास झाला पाहिजे. फक्त आणि फक्त शिर्डी आणि पंचक्रोशीतील मुलांसाठी हे उघडले पाहिजे. आपण दवाखाना उघडला तिथे २५ टक्केच स्थानिक लाभ घेतात, बाकी ७५ टक्के बाहेरचे आहेत असंही सुजय विखे पाटील यांनी सांगितले. 

शिवसेनेने सुजय विखेंच्या मागणीचा केला निषेध

जगभरातून साईभक्त शिर्डीत येतात. ते श्रद्धेपोटी तिथे येतात. कोट्यवधीची देणगी देतात. भाविक जेवणासाठी तिथे येत नाहीत. अन्नदान हे चांगले काम आहे. त्यांच्याकडून पैसे घेण्याची मागणी करणे गैर आहे. भिकारी तिथे येतात आणि जेवतात हे म्हणणे म्हणजे साईभक्तांचा अपमान करण्यासारखं आहे असं सांगत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सुजय विखे यांच्या विधानाचा निषेध केला आहे. 

Web Title: Sujay Vikhe Patil demands that Rs 25 should be charged in Shirdi Sai Temple Prasadalaya, the entire country is eating for free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.