रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 22:04 IST2025-11-03T22:02:33+5:302025-11-03T22:04:50+5:30
Indian Railways Diabetic food News: भारतीय रेल्वेने मधुमेह रुग्णांना दिलासा देणारी सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा देशातील लांब पल्ल्याच्या प्रमुख रेल्वे गाड्यांमध्ये सुरू झाली आहे.

रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
Indian Railways Diabetic food : देशात मधुमेहींचे वाढते प्रमाण लक्षात घेता भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या आरोग्यासाठी आता रेल्वे प्रवासात साखरमुक्त जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. वंदे भारत एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी आणि दुरांतोसारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये रेल्वे प्रशासनाने डायबेटिक फूड' म्हणजेच साखरमुक्त जेवण सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही वर्षात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष दिले आहे. तसेच सध्या रेल्वे प्रवाशांकडून 'डायबेटिक फूड' प्रकारच्या अन्नाची मागणी वाढली आहे. या मागणीला अनुसरून रेल्वे मंत्रालयाने अशाप्रकारच्या अन्नाची सुविधा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांना आता तिकीट बुकिंग दरम्यान मधुमेही आहार आणि नियमित जेवण यापैकी एक निवडता येईल. हा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करणारा संतुलित आहार दिला जाईल, असे आयआरसीटीसीने म्हटले आहे. त्यामुळे मधुमेहाने ग्रस्त प्रवाशांना आरामदायी प्रवास करताना डायबेटिक फूडने प्रवास अधिकच सुखकर होणार आहे.
डायबेटिक फुड म्हणजे नेमके काय असते?
'डायबेटिक फूड' म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांसाठी बनवलेल किंवा शिफारस केलेले पौष्टिक आणि संतुलित अन्न होय. यात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश असतो, जसे की फले भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीचे प्रथिने. हे अन्न रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
मधुमेहींची खाण्या-पिण्याची चिंता मिटणार?
बाहेरगावीजाताना मधुमेही रुग्णांना खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष ठेवावे लागते. बऱ्याच वेळा हे रुग्ण डायबेटिक फूड सोबत ठेवत असतात. तसेच प्रवासात बाहेरूनही असे पदार्थ मागवत असतात. मात्र, आता हे पदार्थ रेल्वेतच मिळणार असल्याने अशा प्रवाशांची प्रवासात खाण्या-पिण्याची चिंता मिटणार आहे.
कोणत्या रेल्वे गाडीत मिळणार ही सुविधा
वंदे भारत, राजधानी, शताब्दी आणि दुरांतो सारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या मधुमेही प्रवाशांना 'डायबेटिक फूड' मिळणार आहे. सध्या भुसावळ विभागातुन धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस व राजधानी एक्सप्रेस मध्ये ही सुविधा सुरू आहे. तसेच अन्य रेल्वेगाड्यांमध्येही भविष्यात ही सुविधा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
भविष्यात अन्य रेल्वेमध्येही सुविधा लवकरच सुरू होणार
रेल्वेने आता मधुमेहींना अनुकूल अन्नपदार्थांचा मेनूमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जे प्रवाशांना त्यांच्या साखरेच्या पातळीबद्दल जागरूक राहावे लागेल.
त्यांना आता रेल्वे प्रवासादरम्यान बाहेरून येणारे असुरक्षित अन्न खाण्याची गरज भासणार नाही. हे पाऊल केवळ प्रवाशांच्या सोयी सुधारेल असे नाही तर निरोगी खाण्याच्या सवयींना देखील प्रोत्साहन देईल. जर हा उपक्रम यशस्वी झाल तर भविष्यात इतर प्रीमियम आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही ही सुविधा सुरू होणार आहे.