बदलापुरात असे फोफावले रॅकेट...मानवी स्त्रीबीजांचा व्यापार कसा रोखणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 10:08 IST2026-03-08T10:08:07+5:302026-03-08T10:08:48+5:30
बदलापुरातील मानवी स्त्रीबीजाच्या व्यापाराचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.

बदलापुरात असे फोफावले रॅकेट...मानवी स्त्रीबीजांचा व्यापार कसा रोखणार?
डॉ. प्रवीण शिनगारे
माजी वैद्यकीय शिक्षण संचालक
बदलापुरातील मानवी स्त्रीबीजाच्या व्यापाराचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. पन्नास वर्षांपूर्वी भारतात अपत्य होत नसलेल्या (वंध्यत्व) जोडप्यांची संख्या फक्त २ टक्के होती. आज ती २० टक्के आहे. अशा अपत्यहीन दाम्पत्यांवरील वंध्यत्व उपचारासाठी असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) सेंटर काम करतात. या सेंटर्सना स्त्रीबीजांची गरज असते. त्यासाठी ते दाते शोधतात. गरीब महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या स्त्रीबीजांडकोशातील बीज काढतात आणि ते फलित करून दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडतात...
मानवी स्त्रीबीजाच्या व्यवहारात किडनी रॅकेटएवढा पैसा दिसल्यामुळे काही एजंटांनी आता तस्करीसाठी या क्षेत्राची निवड केली. डॉ. हर्षवर्धन हे केंद्रीय आरोग्यमंत्री असताना एआरटी कायदा २०२१ अमलात आला. या कायद्यामुळे गैरव्यवहार व गरीब महिलांच्या शोषणावर काही प्रमाणात नियंत्रण आले. एआरटी उपचार पद्धतीमध्ये दोन संस्था संगनमताने काम करतात.
स्त्रीबीज बँक : पुरुषांचे शुक्राणू जमा करून ते सुरक्षित ठेवणे ही खूपच सोपी पद्धत आहे. याउलट स्त्रीबीज बँकेचे काम क्लिष्ट आहे. साधारणपणे २१ ते ५० या वयोगटातील स्त्रिया शोधायच्या, डॉक्टरांकडून इंजेक्शन द्यायची, सोनोग्राफीमध्ये स्त्रीबीजांची वाढ तपासायची व योग्य वेळी दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून स्त्रीबीज बाहेर काढायचे व ते बँकेत ठेवायचे, अशी ती प्रक्रिया आहे. यासाठी दाता स्त्रीला २० ते ३० हजार रु. मिळतात. तेच स्त्रीबीज गरजू वंध्यत्व जोडप्यास एआरटी केंद्रामार्फत एक लाखांना विकले जाते.
एआरटी सेंटर : ज्या दाम्पत्यांना मूल नाही, पण हवे आहे ते एआरटी सेंटरकडे जातात. हे सेंटर राज्य शासनाकडे नोंदवलेले असते. त्यांच्या परवान्यावर स्त्रीरोगतज्ज्ञांचे व एम्ब्रियोलॉजिस्ट (गर्भशास्त्र किंवा भ्रूणविज्ञान तज्ज्ञ) यांचे नाव असते. त्या केंद्रात सर्व नियमांचे पालन करण्याची जबाबदारी त्यांची असते. स्त्रियांच्या शरीरातून बीज काढणे व ते बँकेत पाठवणे तसेच गरजू रुग्ण आल्यास बँकेतून योग्य ते बीज मागवणे व त्याचा वंध्य स्त्रीच्या पतीच्या शुक्राणूबरोबर संयोग घडवणे व त्यानंतर ते फलन झालेले बीज (आता गर्भ) वंध्य स्त्रीच्या गर्भाशयात सोडणे ही सर्व प्रक्रिया या केंद्रात होते व ती मान्यताप्राप्त केंद्रामध्येच करावी लागते.
स्त्रीबीज तस्करी होते तरी कशी?
स्त्रीबीज (अंडाणू) काढण्यासाठी प्रक्रिया ही सोपी (लॅपरॉस्कोपिक) दुर्बिणीमधून करावयाची असल्यामुळे मान्यताप्राप्त सेंटरला न करता घरामध्येच केली जाते.
एका वेळेला १५ ते २० बीज काढले जातात. (एक बीज अंदाजे १ लाख रु.)
एका स्त्रीदात्याला पैसे देऊन वारंवार ३ ते ४ महिन्यांच्या अंतराने पुन:पुन्हा बीज काढतात.
दाता एकच, पण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नावांनी बोगस आधार कार्डच्या मदतीने बीज काढून घेतात व दाते वेगवेगळे आहेत, असे दाखवतात.
गोऱ्या, नाकीडोळी छान, मध्यम बांधा असलेल्या स्त्रीच्या शरीरातून एका वेळेला २० ते २५ स्त्रीबीजे काढून घेतली जातात.
एआरटी सेंटरचा परवाना एका पात्र व्यक्तीच्या नावे असतो, पण दुसराच एक अपात्र व्यक्ती चालवतो.
नैतिकतेचे धडे देण्याची गरज
बेकायदेशीर रॅकेट चालवणारे, तस्करी करणारे व गैरव्यवहार करणारे या पद्धती वापरतात. स्त्रीबीज हे फक्त स्त्रियांचे मानवी शरीरच दान करू शकते. कायद्यानुसार डोनरला दान फक्त परोपकारी, नि:स्वार्थी वृत्तीने करता येते, विकता येत नाही.
काही डॉक्टर अनैतिक व्यवसायाकडे आर्थिक फायद्यासाठी आकर्षित झाल्याचे दिसून येते. त्यांना नैतिकतेचे धडे देण्याची गरज आहे. वकिलांपेक्षा डॉक्टर हुशार असल्यामुळे ते नवनवीन पळवाटा शोधून काढतील. बदलापूर येथील घटनेमध्ये पीडितांना न्याय व आरोपींना कठोर शासन दिल्यास इतरांवर थोडा तरी वचक बसेल.