'एसटी'चे आणखी एक पाऊल 'कॅशलेस' कडे ; प्रवाशांसाठी 'ओव्हर द काऊंटर' कार्ड सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 20:57 IST2020-10-19T20:56:42+5:302020-10-19T20:57:47+5:30
‘ओटीसी’ कार्डच्या वापरासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता भासणार नाही...

'एसटी'चे आणखी एक पाऊल 'कॅशलेस' कडे ; प्रवाशांसाठी 'ओव्हर द काऊंटर' कार्ड सुरू
पुणे : ‘एसटी’कडून बसमध्ये पैशांची देवाण-घेवाण कॅशलेस होण्यासाठी पावले टाकली जात आहेत. सध्या विविध सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठी स्मार्टकार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. हे स्मार्टकार्ड संबंधित प्रवाशांच्या आधार कार्ड व मोबाईलशी लिंक केलेले असते. पण आता कोणत्याही ओळखपत्राची गरज नसलेले ‘ओटीसी’ कार्ड तयार करण्यात आले आहे. या कार्डचा वापर कोणीही करू शकणार आहे.
विविध योजनांतर्गत सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठीच्या स्मार्टकार्ड पाठोपाठ आता एसटी महामंडळाने ओव्हर द काऊंटर (ओटीसी) कार्ड सुरू केले आहे. या कार्डवर प्रवाशांचे नाव, छायाचित्र अशी कोणतीही माहिती नसेल. एका खासगी कंपनीच्या एजंटकडून हे कार्ड रिचार्ज करून मिळेल. हे कार्ड बसमधील वाहकाच्या मशीनवर लावल्यानंतर प्रवासासाठीचे पैसे कार्डमधून जातील. या कार्डच्या वापरासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता भासणार नाही.
‘ओटीसी’ कार्ड स्मार्टकार्ड सारखेच असले तरी त्यावर छायाचित्र किंवा प्रवाशाचे नावही नसेल. एसटीने करार केलेल्या एका खासगी कंपनीच्या एजंटकडून हे कार्ड मिळणार आहे. एसटी बसस्थानकांवर हे कार्ड मिळणार नाही, असे एसटी स्पष्ट करण्यात आले आहे. एजंटला प्रवाशाचे नाव व मोबाईल क्रमांक सांगितल्यानंतर लगेच हे कार्ड मिळू शकेल. त्यावर फक्त कार्डचा नंबर व अन्य माहिती असणार आहे. या एजंटकडूनच प्रवाशांना आपल्या प्रवास खर्चानुसार रिचार्ज करून मिळेल. त्यांना पैसे दिल्यानंतर कार्ड रिचार्ज होईल.
---------------
असा करता येईल वापर
रिचार्ज केलेले कार्ड बसमध्ये वाहकाकडे द्यावे लागेल. वाहक आपल्याकडी ‘ईटीआयएम’ मशीनवर हे कार्ड लावेल. कार्डची माहिती मशीनवर आल्यानंतर प्रवाशांना उतरण्याचा थांबा सांगावा लागेल. त्यानुसार वाहक मशीनमधील थांबा निवडेल. कार्डमध्ये पुरेसे पैसे असल्यास वाहकाकडून पुढील प्रक्रिया करून प्रवाशांना तिकीट दिले जाईल. कार्डमध्ये पैसे नसल्याने प्रवाशांना रोख रक्कम द्यावी लागेल. ही प्रक्रिया करताना प्रवाशाला कोणतेही ओळकपत्र दाखवावे लागणार नाही.