एसटीची दिवाळी; २१ कोटींची केली तिकीटविक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 07:33 IST2025-11-11T07:31:32+5:302025-11-11T07:33:34+5:30
ST Mahamandal News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी ) महामंडळाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगला यंदाच्या दिवाळीत विक्रमी प्रतिसाद मिळाला. केवळ ऑनलाईन तिकीट विक्रीतून २१ कोटी ४४ लाख १३ हजार १९१ रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला असून तो गेल्यावर्षीच्या तुलनेत ४.७७ कोटी रुपयांनी वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एसटीची दिवाळी; २१ कोटींची केली तिकीटविक्री
मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी ) महामंडळाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगला यंदाच्या दिवाळीत विक्रमी प्रतिसाद मिळाला. केवळ ऑनलाईन तिकीट विक्रीतून २१ कोटी ४४ लाख १३ हजार १९१ रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला असून तो गेल्यावर्षीच्या तुलनेत ४.७७ कोटी रुपयांनी वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसटी महामंडळाला दिवाळी हंगामात ३०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. १८ ते २७ ऑक्टोबर या १० दिवसांत एसटीने दररोज सरासरी ३० कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान, या कालावधीत एसटीच्या ऑनलाईन बुकिंग प्रणालीच्या माध्यमातून ४ लाख ४१ हजार ४७४ तिकिटांची विक्री झाली. या तिकिटांवर ६ लाख ६० हजार ५४४ प्रवाशांनी प्रवास केला. गेल्यावर्षी दिवाळी कालावधीत प्रवास केलेल्या प्रवाशांच्या तुलनेत यावर्षी १ लाख ४ हजार ११६ प्रवासी जास्त असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे.
आर्थिक संजीवनी
प्रवाशांचा वाढता प्रतिसाद एसटी महामंडळासाठी एक आर्थिक संजीवनी ठरला आहे. ऑनलाईन तिकीट विक्रीप्रणाली अधिक प्रभावी, सुरक्षित आणि जलद झाल्यामुळे राज्यातील कोट्यवधी प्रवाशांचा ‘लाल परी’वरील विश्वास अधिक दृढ झाला असून डिजिटल तिकीट बुकिंगच्या माध्यमातून ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंतच्या प्रवाशांनी महामंडळाच्या या सुविधेचा पुरेपूर लाभ घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.