'अरे' ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, सीमावादप्रश्नी अजित पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 16:37 IST2022-12-06T16:37:22+5:302022-12-06T16:37:48+5:30

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे.

stone-pelting-on-maharashtra-truck-on-karnataka-border-6-trucks-smashed-ajit-pawar-commented-maharashtra-govt-devendra-fadnavis-eknath-shinde | 'अरे' ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, सीमावादप्रश्नी अजित पवारांची प्रतिक्रिया

'अरे' ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, सीमावादप्रश्नी अजित पवारांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. तसंच 'अरे' ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, असं ते म्हणाले.

"मराठीभाषिक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला आहे. अशा भ्याड हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. असे भ्याड हल्ले  महाराष्ट्र सरकारने खपवून  घेऊ नयेत,” असे अजित पवार म्हणाले.

“महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी. निव्वळ निषेध करून चालणार नाही. 'अरे' ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी. कर्नाटक सरकारच्या पाठींब्यामुळेच हे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात कणखर भूमिका घ्यावी. केंद्र सरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. मराठी माणसांच्या रक्षणासाठी, अस्मितेसाठी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजूटीने सीमाभागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे आहेत. सत्तारुढ पक्षांनीही आपले कर्तव्य पार पाडावे. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागात अनुचित प्रकार आणि भ्याड हल्ले खपवून घेवू नयेत. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे." असेही ते म्हणाले.

बेळगावात ट्रकवर दगडफेक
बेळगाव-हिरेबागवाडी येथे महाराष्ट्र पासिंगचे ट्रक लक्ष्य करण्यात आले. यात ६ ट्रकचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्याविरोधात कन्नड रक्षण वेदिकांची घोषणाबाजी सुरू असून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे ट्रक रोखून त्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

Web Title: stone-pelting-on-maharashtra-truck-on-karnataka-border-6-trucks-smashed-ajit-pawar-commented-maharashtra-govt-devendra-fadnavis-eknath-shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.