धर्माच्या राजकारणाने देशाला धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचविले - प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्षावरही सोडले टीकास्त्र

By संतोष भिसे | Updated: February 20, 2025 16:15 IST2025-02-20T16:14:58+5:302025-02-20T16:15:38+5:30

श्रद्धांजलीची पहिली पोस्ट खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच टाकली होती 

Stock market has crashed since Prime Minister Narendra Modi returned from America says Prakash Ambedkar, criticizes the opposition party | धर्माच्या राजकारणाने देशाला धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचविले - प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्षावरही सोडले टीकास्त्र

धर्माच्या राजकारणाने देशाला धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचविले - प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्षावरही सोडले टीकास्त्र

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाऊन आल्यापासून शेअर बाजार पूर्णपणे कोसळला आहे. धर्माच्या राजकारणाने देशाला धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचविले असून विरोधी पक्ष लकवा मारलेल्या स्थितीत आहे. त्यांनी स्वतःला सावरुन हिटलरशाही सरकारचा विरोध करावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

ते सांगलीत पत्रकार बैठकीत बोलत होते. आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, पण ते अमेरिकेतून परतल्यापासून शेअर बाजार पूर्णपणे कोसळला आहे. रुपया घसरत असून डॉलर महाग होत आहे. जीएसटी संकलन घटले आहे. अर्थव्यवस्थेवर मोठे संकट आहे. यावरविरोधी पक्षाने मौन पाळले आहे. कुंभमेळ्याचे मार्केटिंग निषेधार्ह आहे. चेंगराचेंगरीत हजारहून अधिक लोक मेले, पण शासनाने फक्त ३८ आकडा जाहीर केला. या मृतदेहांवर अंत्यविधी कसे केले? हे हिंदू संघटनांनी जाहीर करावे.

आंबेडकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन्ही राजांनी प्रेरणादायी इतिहास निर्माण केला. मराठा समाजाने त्यातच अडकून न राहता नवा इतिहास निर्माण करावा.

निवडणुकीविरोधात याचिका

ॲड. आंबेडकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहानंतर ७६ लाख मतदान झाल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. हे संशयास्पद आहे. त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. १८ मार्चरोजी सुनावणी होईल. त्यावेळी आयोगाने न्यायालयात खरे सांगावे यासाठी लोकांनी नैतिक दबाव आणला पाहिजे.

पहिली श्रद्धांजलीची पोस्ट पंतप्रधानांची

ॲड. आंबेडकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली म्हणून भाजपवाले दंगा करीत आहेत. पण श्रद्धांजलीची पहिली पोस्ट खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच टाकली होती. राहुल गांधी यांनी ती कॉपी केली असावी.

मुंडेंच्या राजीनाम्याने खुनी कळेल?

स्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाविरोधातील आंदोलन वेगळ्या वळणाने निघाले आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याने खुनी कोण? हे बाहेर पडेल असे नाही. खून करणारे आणि तो करायला सांगणारे सापडले पाहिजेत. मुंडे त्यात बसत असतील, तर तेदेखील आरोपी व्हायला हवेत असेही ॲड. आंबेडकर म्हणाले.

Web Title: Stock market has crashed since Prime Minister Narendra Modi returned from America says Prakash Ambedkar, criticizes the opposition party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.