राज्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीची पावणेपाच हजार कोटींची थकबाकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 19:06 IST2019-04-03T19:02:56+5:302019-04-03T19:06:17+5:30
राज्यातील १६१ साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम थकीत आहे...

राज्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीची पावणेपाच हजार कोटींची थकबाकी
पुणे : राज्यातील १६१ साखर कारखान्यांकडे मार्च अखेरीस ४ हजार ८३१ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी असून, अवघ्या ३४ कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) शंभर टक्के देणी दिली आहेत.
राज्यातील १०२ सहकारी आणि ९३ खासगी अशा १९५ साखर कारखान्यातून १ एप्रिल अखेरीस ९३९.१४ लाख टन ऊस गाळपातून १०५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. तर, १३८ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. राज्यात १५ मार्च अखेरीस ९०५ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यानुसार २१ हजार १५४ कोटी ४८ लाख रुपयांची एफआरपी होते. त्यापैकी १६ हजार ५४४ कोटी ९३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. अजूनही पावणेपाच हजार कोटींहून अधिक रुपयांची थकबाकी आहे.
राज्यातील १६१ साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम थकीत आहे. अवघ्या ३४ कारखान्यांनीच शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम दिलेली आहे. तर, पाच कारखान्यांनी एफआरपीची एकही दमडी शेतकऱ्यांना दिलेली नाही. तर, १२ कारखान्यांनी शंभरातील ३९ रुपयेच कारखान्यांना दिले आहेत. या पुर्वीच्या हंगामातील २५८.४८ कोटी रुपयांची थकबाकी काही कारखान्यांकडे आहे. वारंवार बजावूनही एफआरपी न देणाऱ्या ४९ कारखान्यांवर साखर आयुक्तालयाने रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेटची (आरआरसी) कारवाई केली आहे.
----
शंभरटक्के एफआरपी दिलेले कारखाने- ३४
८० ते ९९ टक्के दिलेले - ५७
६० ते ७९ टक्के -५३
४० ते ५९ टक्के - ३४
३९ टक्क्यांंपेक्षा कमी -१२
शून्य एफआरपी दिलेले ५
मागील थकीत एफआरपी २५८.४८ कोटी