The state will dry for next five days | राज्यात पुढचे पाच दिवस कोरडे
राज्यात पुढचे पाच दिवस कोरडे

पुणे/मुंबई : मराठवाडा, विदर्भ, खान्देशात पुरेशा पावसाअभावी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असताना राज्यात १७ जुलैपर्यंत म्हणजे पाच दिवस पाऊस हुलकावणीच देईल, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

मान्सूनचा अक्ष बदलल्याने उत्तर भारत, ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. त्यामुळे दक्षिण भारतासह राज्यात मान्सून क्षीण झाला आहे. परिणामी, १७ जुलैपर्यंत राज्यात कोकण वगळता पावसाचा जोर राहणार नाही. उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असे वेधशाळेने कळविले आहे.

हवामान तज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, राज्यात १७ जुलैपर्यंत मान्सूनचा खंड पडेल. त्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय होईल. दर मोसमात मान्सूनचा अक्ष एक-दोनदा बदलत असतो. ही सामान्य बाब आहे. राज्यात यंदा दोन आठवडे पाऊस उशिरा सुरु झाला. मराठवाड्यात आधीच पाऊस कमी पडतो. यंदा तो देखील पुरेसा नाही. म्हणून मराठवाड्यात या खंडाची तीव्रता अधिक असेल. विदर्भात देखील यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे.

मुंबई, नाशिक, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात दमदार पाऊस झालेला नाही. मराठवाड्यात आजवर ३० टक्क्यांच्या आसपास पाऊस होण्याची अपेक्षा असताना फक्त १५.७ टक्के पाऊस झाला आहे. अशीच कमीजास्त परिस्थिती विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांची आहे.
 

पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती चांगली

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात उशीरा परंतु धुवाँधार पाऊस झाल्याने धरणांमधील साठा समाधानकारक झाला आहे. महाराष्ट्राचे वरदायिनी असलेल्या कोयना धरणात गेल्या सात दिवसांत २४ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. तर सध्या साठा ४२ टीएमसीच्या वर आहे. पुण्याला पाणीपुरवठा होणारे खडकवासला आणि कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे तर गुंजवणी आणि पानशेत धरणातील पाणीसाठा निम्म्यावर पोचला आहे. मुंबईची परिस्थितीही तुलनेने चांगली आहे.

जलप्रकल्प तहानलेलेच

अर्धा पावसाळा झाल्यावरही राज्यातील जलप्रकल्पांमध्ये केवळ १९ टक्केच साठा आहे. मराठवाड्यातील प्रकल्पांत फक्त ०.२३% साठा आहे. जायकवाडीची पातळीदेखील अजून मृतसाठ्याच्या वरती आलेली नाही. राज्यात दोन हजार ८६८ लघू प्रकल्प असून त्यामध्ये १७.९२ टक्के, २५८ मध्यम प्रकल्पांमध्ये २९.७२ टक्के तर १४१ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३३.१४ टक्के पाणीसाठा आहे.
 


Web Title: The state will dry for next five days
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.