Omicron Alert: ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्याची मार्गदर्शक तत्त्वे जारी; आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कडक नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 00:01 IST2021-11-30T23:59:48+5:302021-12-01T00:01:05+5:30
Omicron Alert: केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना टेस्टिंग वाढवण्याची, आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राज्य सरकारने नागरिकांसाठी नियमावली जाहीर केली आहे.

Omicron Alert: ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्याची मार्गदर्शक तत्त्वे जारी; आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कडक नियम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा राज्य सरकार अलर्ट झाले आहे. यातच दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली आहे. दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्रवासाच्या नियमावलीत बदल केले आहेत.
तसेच, केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना टेस्टिंग वाढवण्याची, आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राज्य सरकारने नागरिकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये प्रवाशाने प्रवास सुरू करण्यापूर्वी 15 दिवसांची प्रवासाची माहिती सादर करणे आवश्यक आहे.
विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना येथे आल्यावर कोरोना टेस्ट करावी लागेल आणि टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत विमानतळावर थांबावे लागेल. प्रवाशाची टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. विमानतळावर धोका असलेल्या देशांतून येणार्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना प्राधान्याने उतरवले जाऊ शकते आणि MIAL आणि विमानतळ प्राधिकरणाकडून त्यांच्या चेकिंगसाठी वेगळ्या काउंटरची व्यवस्था केली जाईल.
याचबरोबर, विमानतळावर आरटीपीसीआर टेस्ट केली जाईल. त्यानंतर पुढील सात दिवस स्वत:च्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले जाईल. धोका असलेला देश वगळता इतर कोणत्याही देशांतील प्रवाशांना अनिवार्यपणे 14 दिवस होम क्वारंटाईन करावे लागेल. पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना रुग्णालयात हलवण्यात येईल.
याशिवाय, देशांतर्गत विमान प्रवासाच्या बाबतीत, राज्यात प्रवास करणार्या प्रवाशांना एकतर संपूर्ण लसीकरण करावे लागेल किंवा प्रवासाच्या 48 तासांच्या आत अनिवार्यपणे आरटीपीसीआर टेस्ट करावी लागेल. तसेच, इतर राज्यातील प्रवाशांच्या बाबतीत, आगमनानंतर 48 तासांच्या आत निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट अपवादाशिवाय अनिवार्य असेल.