"राज्य सरकारकडून जनतेच्या आरोग्याशी खेळ, १४.५२ टक्के सेलेनियम असलेल्या गव्हाचे रेशनमधून वितरण", काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:13 IST2025-03-26T15:13:04+5:302025-03-26T15:13:48+5:30

Harshavardhana Sapkal News: सरकार उडवाउडवीची उत्तरे देत असून बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? सरकार काय लपवाछपवी करत आहे ? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

"State government is playing with public health, distributing wheat containing 14.52 percent selenium through ration", serious allegation by Congress | "राज्य सरकारकडून जनतेच्या आरोग्याशी खेळ, १४.५२ टक्के सेलेनियम असलेल्या गव्हाचे रेशनमधून वितरण", काँग्रेसचा गंभीर आरोप

"राज्य सरकारकडून जनतेच्या आरोग्याशी खेळ, १४.५२ टक्के सेलेनियम असलेल्या गव्हाचे रेशनमधून वितरण", काँग्रेसचा गंभीर आरोप

मुंबई -  बुलढाणा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील हजारो लोकांना केस गळतीच्या गंभीर त्रासाला सामारे जावे लागले. केस गळतीने टक्कल पडण्याचा प्रकार वाढत असताना त्यामागे काय कारण आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे पण तीन महिने झाले सरकारने केस गळती व टक्कल पडण्याच्या कारणाचा अहवाल जाहीर केलेला नाही. सरकार उडवाउडवीची उत्तरे देत असून बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? सरकार काय लपवाछपवी करत आहे ? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, डिसेंबरच्या पंधरवाड्यात बुलढाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील १९ गावात केस गळून टक्कल पडण्याचे प्रकार झाले. ही टक्कल का पडत आहेत? याचे शास्त्रीय कारण सरकारने अजून दिले नाही. सरकार आता टकलावर केस येत आहेत हे सांगत आहे, यासाठी कोणते तेल वापरले असे सरकारला विचारावे का? असे म्हणत केस गळती का झाली? याचे शास्त्रीय कारण मात्र देत नाहीत. ज्या भागात केस गळती झाली तो खारपाण पट्टा आहे. केस गळतीच्या तक्रारी आल्यानंतर सरकारने त्याची चौकशी केली पण त्यासंदर्भातला ICMR चा अहवाल अजून आलेला नाही असे सरकार सांगत आहे. मग सरकराने त्यांचा माणूस त्या संस्थेकडे पाठवावा, ही संस्था काय चंद्रावर आहे का? पण सरकार हा अहवाल दडपण्याचा प्रयत्न करत आहे किंवा अहवाल बदलण्याचा प्रयत्न करत आहे, असे सपकाळ म्हणाले.

राज्य सरकारचा अहवाल आला नसला तरी दुसरीकडे प्रख्यात डॉक्टर आणि संशोधक पद्मश्री हिम्मतराव साळुबा बावस्कर यांनी मात्र त्या भागातील त्वचेचे, नखाचे, मातीचे व रेशनवर वितरीत करण्यात आलेल्या गव्हाचे सॅम्पल गोळा करून, त्याची प्रयोगशाळेत तपासणी करून त्याचा अहवाल सरकारला दिला. हा सर्व प्रकार सार्वजनिक वितरण प्रणालीतील गव्हामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या गव्हात मोठ्या प्रमाणात सेलेनियम आढळून आले आहे ते तब्बल १४ टक्के पेक्षा जास्त आहे. सेलेनियम १.९ टक्के पर्यंत हानीकारक नाही पण सेलेनियम अधिक प्रमाणात असल्यामुळे मळमळ येणे, खाज येणे, मधुमेहाच्या तक्रारी येतात हे संशोधन आहे आणि यातून ते एका निष्कर्षापर्यंत पोहचले व तसा पत्रव्यवहार बावस्कर यांनी शासनाशी केला पण सरकारने त्यांच्या अहवालाला केराची टोपली दाखवली.

हिम्मतराव बावस्कर यांना पद्मश्री देण्याची शिफारस ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना केली होती व नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांना पद्मश्रीचा सन्मान दिला आहे. अशा सन्माननीय बावस्कर यांना काय घंटा कळते का? असे उद्दाम वक्तव्य जिल्हाधिकारी करतात आणि आम्ही येथे कशासाठी बसलो आहोत? ही भाषा ते करतात. जिल्हाधिकारी हे सरकारी नोकरी करत आहेत त्यांना हे शोभत नाही. या कलेक्टराचा बोलवता धनी सरकार आहे, त्यांना राज्य मंत्र्यांनी याबद्दल काही मोठे पद देण्याचे आमिष दाखवले आहे काय, असा सवाल करत बावस्करांच्या संशोधनावर सरकार काय कार्यवाही करणार, हा गहू कोणत्या भागातून आला होता, याची वस्तुनिष्ठ माहिती द्यावी किंवा बावस्कर यांचे संशोधन चुकीचे आहे हे तरी जाहीर करावे, त्यांच्या संशोधनाची टिंगळटवाळी करु नये. असे सपकाळ म्हणाले.

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचा प्रश्न विधान परिषदेत मांडला असता मंत्री महोदयांनी दिशाभूल करणारी माहिती दिली. हा राजकीय विषय नाही तर लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. यामागे कोणीतरी मोठा माणूस असून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सरकारने लोकांच्या जीवाशी खेळू नये असेही काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: "State government is playing with public health, distributing wheat containing 14.52 percent selenium through ration", serious allegation by Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.