खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 06:29 IST2025-07-13T06:29:27+5:302025-07-13T06:29:53+5:30
‘मिसिंग लिंक’वर केबल स्टेट ब्रीज १८५ मीटर हा देशातील सर्वांत उंच ब्रीज आहे. दोन टप्प्यांत काम चालणार आहे.

खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
खोपोली/पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’च्या कामाची शनिवारी पाहणी केली. यावेळी फडणवीस यांनी ही मार्गिका नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले.
‘मिसिंग लिंक’वर केबल स्टेट ब्रीज १८५ मीटर हा देशातील सर्वांत उंच ब्रीज आहे. दोन टप्प्यांत काम चालणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम ९९ टक्के तर दुसऱ्याचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या सर्वांत आव्हानात्मक भागाचे काम सुरू आहे. या भागात ८५ किलोमीटर वेगाने वारे वाहतात. ते सहन करतील, असे बांधकाम एमएसआरडीसी व इतर संस्था करत आहेत. त्यांचेही अभिनंदन केले पाहिजे, असे फडणवीस यांनी सांगितले.
अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार : फडणवीस
‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर शिंदे म्हणाले, मिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत असून, हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.