‘एसटी’ धावणार आरोग्य सेवेत; पहिले रुग्णालय सांगवीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 12:21 AM2018-09-15T00:21:44+5:302018-09-15T06:20:46+5:30

वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणीही प्रस्तावित

'ST' will run in health care; The first hospital should tell | ‘एसटी’ धावणार आरोग्य सेवेत; पहिले रुग्णालय सांगवीत

‘एसटी’ धावणार आरोग्य सेवेत; पहिले रुग्णालय सांगवीत

Next

- राजानंद मोरे 

पुणे : राज्यातील लाखो प्रवाशांची सेवा करण्याबरोबरच आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) गाडी आरोग्य सेवेतही सुसाट धावणार आहे. एसटीचे राज्यातील पहिले रुग्णालय पुण्यातील सांगवी येथे उभारण्यात येईल. शंभर खाटांच्या या रुग्णालयासोबतच वैद्यकीय महाविद्यालयही प्रस्तावित आहे. त्याबाबतची प्रक्रियाही नुकतीच सुरू करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाची पुणे ते अहमदनगर मार्गावर १९४८मध्ये पहिली बस धावली. या घटनेला यंदा ७० वर्षे पूर्ण होत आहेत. या ७० वर्षांमध्ये एसटी महामंडळाची सेवा कोट्यवधी प्रवाशांपर्यंत पोहोचली. दररोज हजारो बस राज्यभर प्रवाशांना सेवा देत आहेत. या काळात अनेक चढ-उतार पाहिलेल्या एसटीचे रूप मागील काही वर्षांपासून बदलत आहेत. प्रवाशांच्या सोयीनुसार अत्याधुनिक बस, अद्ययावत बस स्थानक, गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा, प्रवाशांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आता तर एसटीने ‘ट्रॅक’ बदलला असून प्रवासी सेवेबरोबरच आरोग्य सेवेतही उडी घेतली आहे.

‘एसटी’ने स्वत:च्या मालकीचे १०० खाटांचे अतिविशेष रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एसटीचे हे पहिले रुग्णालय सांगवी येथील एसटीच्या जागेत होणार आहे. एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रुग्णालय व महाविद्यालयाची उभारणी केली जाणार आहे. सांगवी येथे महामंडळाची एकूण चार हेक्टर जागा आहे. या जागेतील काही भागात सध्या एसटी कॉलनी आहे. या जागेत पहिल्या टप्प्यामध्ये रुग्णालय बांधले जाणार आहे. त्यासाठी सुमारे पाच एकर
जागा लागणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. सुमारे २० हजार ६३८ चौरस मीटर जागेत  रुग्णालयाची बांधणी केली जाणार आहे. पुढील दोन वर्षांत हे रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. सध्या एसटी कॉलनी याच जागेत राहील. कॉलनी हलविण्याबाबत नियोजन नाही. सुरुवातीला वाशी येथे रुग्णालयाबाबत चर्चा झाली होती.

कर्मचाऱ्यांना २५ टक्के आरक्षण
एसटीच्या पहिल्या रुग्णालयामध्ये सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एसटीतील सर्व कर्मचाºयांना या ठिकाणी २५ टक्के खाटा आरक्षित ठेवल्या जातील. उपचारही सवलतीच्या दरात मिळतील. तर, पुढील टप्प्यात होणाºया महाविद्यालयामध्ये सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी २५ टक्के जागा एसटीतील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आरक्षित असतील, असे अधिकाºयांनी सांगितले.

प्रक्रियेला सुरुवात
रुग्णालय उभारण्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. हे रुग्णालय पीपीपी किंवा बीओटी तत्त्वावर उभारले जाणार आहे. त्यानुसार प्रकल्पाची आखणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, निविदाविषयक कार्यवाही, विकसकाची निवड व प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्याची तज्ज्ञ व अनुभवी सल्लागार संस्थेची नेमणूक केली जाणार आहे. ही प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून, दि.२० आॅक्टोबर रोजी संस्थेची निवड होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: 'ST' will run in health care; The first hospital should tell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.