एसटी बसस्थानकं आता चकाचक होणार! दर १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम अनिवार्य; राज्यभर स्वच्छतेचा नवा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:42 IST2025-12-31T13:38:16+5:302025-12-31T13:42:02+5:30
एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

एसटी बसस्थानकं आता चकाचक होणार! दर १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम अनिवार्य; राज्यभर स्वच्छतेचा नवा फॉर्म्युला
MSRTC: राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवरील अस्वच्छतेचा प्रश्न आता गंभीर झाला असून, खुद्द परिवहन विभागानेच आता कंबर कसली आहे. सोलापूर बसस्थानकातील भीषण अस्वच्छता पाहून संतापलेल्या परिवहन मंत्र्यांनी आगार प्रमुखाचे थेट निलंबन केले होते. या कारवाईनंतर आता राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर दर १५ दिवसांनी ' स्वच्छता मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर आगार प्रमुखांवर झाली होती निलंबनाची कारवाई
काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बसस्थानकाची पाहणी केली होती. त्यावेळी स्थानकातील अस्वच्छता पाहून त्यांनी संताप व्यक्त केला होता आणि तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बस आगार हे अस्वच्छतेचे आगार बनले आहे, असे खडेबोल त्यांनी सुनावले होते. मात्र, आठवडा उलटल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याचे पाहून सरनाईक यांनी थेट कारवाई केली. त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत आगार प्रमुखाला जागेवरच निलंबित करण्याचे आदेश दिले.
दर १५ दिवसांनी 'स्वच्छता मोहीम' सक्तीची
त्यानंतर प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महामंडळाने आता नवीन नियमावली जाहीर केली आहे. यानुसार बसस्थानकातील बैठक व्यवस्था, फरशी, भिंती, काच आणि विशेषतः महिला विश्रांतीगृहे व शौचालयांची १५ दिवसातून एकदा पूर्णपणे स्वच्छता करावी लागेल. यासंदर्भात निवेदन जारी करण्यात आलं आहे.
"महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ दिवसांनी सर्वकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटीची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा महत्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत बसस्थानकातील बैठक व्यवस्था, फरशी, भिंती. काच, शौचालये, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, महिला विश्रांतीगृहे, कार्यालयीन कक्ष आदींची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. साचलेला कचरा, अनावश्यक झाडे-झुडपे, जाहिरातींचे फलक, जाळी-जमट यांचे निर्मूलन करून परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व नीटनेटका केला जाणार आहे," असं या निवेदनात म्हटलं आहे.
"कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डबे उपलब्ध करून कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण व विल्हेवाट लावली जाणार असून प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी स्वच्छता व नियमित देखभाल ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या अभियानासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिक तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर या मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल, याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. दर १५ दिवसांनी होणाऱ्या या स्वच्छता मोहिमेमुळे एसटी बसस्थानके अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार असून प्रवासी सेवेमध्ये गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे," असंही निवेदनातून सांगण्यात आलं आहे.
प्रवाशांना मिळणार दिलासा
नव्या स्वच्छता मोहिमेमुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. आता ही मोहीम केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात बसस्थानकांचे रूप पालटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.