ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:39 IST2026-04-08T12:38:41+5:302026-04-08T12:39:43+5:30
ST Bus Ticket Price Hike: या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्याचा प्रवास ९० ते १०० रुपयांनी महागणार आहे.

ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या तिकीट दरामध्ये १५ एप्रिलपासून १० टक्के हंगामी वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाताना प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्याचा प्रवास ९० ते १०० रुपयांनी महागणार आहे.
परीक्षा संपल्या की, नागरिकांना गावी जाण्याचे वेध लागतात. एसटी महामंडळाची बस खेड्यापाड्यांमध्ये अगदी घरापर्यंत नागरिकांना पोहचवत असल्याने एसटी बसच सोयीस्कर ठरते. तसेच विविध सवलतींमुळे एसटीचा प्रवास किफायतशीर देखील ठरतो. मात्र, हंगामी भाडे वाढीमुळे एसटीचा प्रवास पुन्हा काही प्रमाणात महागणार आहे.
गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याची एसटी महामंडळाला परवानगी आहे. त्यानुसार गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ केली जाते. गेल्यावर्षी दिवाळीमध्ये एसटी महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ नागरिकांच्या रोषामुळे रद्द केली होती. दरम्यान आता पुन्हा भाडेवाढ मागे घेण्याची नामुष्की एसटी महामंडळावर ओढवू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
हंगामी भाडेवाढ
हंगामी भाडेवाढ ही साधी /मिडी, बसजलद (साधारण), रात्रसेवा, या बस सेवेसाठी लागू राहणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार नव्या भाडेवाढीनुसार प्रवाशांना प्रति टप्पा भाडे किमान भाडे प्रौढ प्रवाशांसाठी १२ रुपये तर, लहान मुलांसाठी ७ रुपये असणार आहे.
असा महागणार प्रवास
बसचा प्रकार (प्रति टप्पा) सध्या उन्हाळी
- साधी (मिडी,साधी) १०.०५ पैसे ११.०५पैसे
- जलद १०.५पैसे ११.०५पैसे
एसटी बसचा मार्ग सध्या उन्हाळी
- परळ-कोल्हापूर(साधी) ६४०रु. ७०४रु.
- मुंबई-छत्रपती ८००रु. ९०० रु.
- संभाजी नगर (साधी)
- मुंबई-सोलापूर(साधी) ७५० रु. ८२५ रु.
- मुंबई—-जालना( साधी) ८००रु. ९०० रु.
- मुंबई—लातूर(साधी) ९०० रु. १०००रु.
- मुंबई-सांगली (साधी) ७३० रु. ८०३रु.
- मुंबई- रत्नागिरी(साधी) ६०० रु. ७००रु.