एसटी महामंडळाला मिळणार 'आयपीएस' कवच! सुरक्षा विभागाला अखेर कणखर नेतृत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:44 IST2025-11-05T19:44:06+5:302025-11-05T19:44:39+5:30
एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाला लवकरच एक अनुभवी आणि शिस्तप्रिय नेतृत्त्व मिळणार आहे.

एसटी महामंडळाला मिळणार 'आयपीएस' कवच! सुरक्षा विभागाला अखेर कणखर नेतृत्त्व
गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पदावर अखेर आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाला लवकरच एक अनुभवी आणि शिस्तप्रिय नेतृत्त्व मिळणार आहे.
महिला अत्याचाराच्या घटनेनंतर झाली होती मागणी
फेब्रुवारी महिन्यात स्वारगेट येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर एसटीच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी स्पष्टपणे समोर आल्या होत्या. या घटनेनंतर, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात एसटीला आयपीएस दर्जाचा अधिकारी देण्याचे ठाम आश्वासन दिले होते.
गृहखात्याचा हिरवा कंदील!
मंत्री महोदयांच्या याच आश्वासनाची पूर्तता आता प्रत्यक्षात येत आहे. एसटी महामंडळाने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला राज्याच्या गृह खात्याने हिरवा कंदील दाखवला आहे. सोबतच, मुख्यमंत्र्यांनीही या महत्त्वाच्या नियुक्तीस मान्यता दिल्याने, एसटीच्या सुरक्षा विभागाला लवकरच आयपीएस अधिकारी प्रमुख म्हणून मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
फायदा काय?
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे एसटीच्या प्रवाशांचा सुरक्षेवरील विश्वास आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच, महामंडळाच्या अंतर्गत कामकाजातील शिस्त आणि कार्यक्षमतेला नवी धार मिळणार असल्याने, संपूर्ण एसटी महामंडळात सकारात्मक बदल दिसून येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.