शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:43 IST2025-12-11T18:40:26+5:302025-12-11T18:43:18+5:30
ST BUS News: राज्यातील विविध विभागांमध्ये शालेय सहलींमध्ये एसटीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
ST BUS News: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यंदा शालेय सहलींना नवीन बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्याचा सकारात्मक परिणाम शालेय सहलीवर झाला असून नोव्हेंबर महिन्यात तब्बल २२४३ बस राज्याच्या विविध आगारातून शालेय सहलींसाठी देण्यात आल्या. यातून महामंडळाला १० कोटी ८५ लाखाचा महसूल प्राप्त झाला आहे.
दिवाळी संपली की शाळेच्या मुलांना वेध लागतात ते शालेय सहलीचे! शालेय सहल हा विद्यार्थी जीवनातील एक हळवा कोपरा असतो. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शालेय सहलीला एसटी महामंडळ बस उपलब्ध करून देते. शासनाने एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शालेय सहलीला ५० टक्के सवलत दिली आहे . त्यामुळे अतिशय माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना शालेय सहलीचा अनुभव घेता येतो. यंदा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शालेय सहलीसाठी नवीन बस उपलब्ध करून देण्याच्या सूचना स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या होत्या. नव्या कोऱ्या एसटीतून राज्यभरातील हजारो विद्यार्थी गड-किल्ले, नयनरम्य समुद्र किनारे, धार्मिक स्थळे यांच्या सहलीला जाऊ लागली. एका नोव्हेंबर महिन्यात तब्बल २२४३ एसटी बसमधून सुमारे १ लाख विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहलीचा आनंद घेतला आहे.
कोल्हापूर विभागाची सर्वोत्कृष्ट कामगिरी
यंदा राज्यातील विविध विभागांमध्ये एसटीच्या शालेय सहलींना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. नोव्हेंबर २०२४ च्या तुलनेत नोव्हेंबर २०२५ मध्ये बससंख्या आणि उत्पन्न या दोन्हीमध्ये सकारात्मक वाढ नोंदली गेली आहे. एसटीच्या ३१ विभागांपैकी कोल्हापूर विभागाने ३७५ एसटी बस शालेय सहलीसाठी उपलब्ध करून देऊन सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवत १ कोटी ७७ लाख रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. त्यानंतर सांगली (२११ बस) व रत्नागिरी (२०१ बस) यांनी चांगली कामगिरी केली आहे.
दरम्यान, डिसेंबर व जानेवारी महिन्यात विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थी- विद्यार्थ्यांना सहलीसाठी नव्या कोऱ्या बस उपलब्ध करून देण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन असून स्वस्त, सुरक्षित आणि आनंददायी सहलीसाठी सर्व शाळांनी एसटीच्या बसेस आरक्षित कराव्यात, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.